योजना अंतिम टप्प्यात : पाणी पुरवठा सभापतींसह नगराध्यक्षांचा मॅरेथॉन दौरा
सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समावेश झालेल्या शाहुपुरी भागासाठी प्रस्तावित असणाऱ्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेचे काम मे अखेर पूर्ण होत आहे. येत्या 1 जुलै पासून ही योजना कार्यान्वित होत असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी दिली .
सातारा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची बैठक पालिकेत पार पडल्यानंतर नगराध्यक्ष माधवी कदम, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, समाजकल्याण सभापती संगीता आवळे, नगरसेविका आशा पंडित, माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील, मा सरपंच गणेश गारडे, राजेंद्र गिरी गोसावी यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शाखा अभियंता सतीश अग्रवाल, माजी शिक्षण सभापती राम हादगे, किशोर पंडित, पाणी पुरवठा विभागाचे संदीप सावंत, बावने, नंदू कांबळे यांच्या उपस्थितीत कण्हेर पाणी पुरवठा योजनेचा दौरा झाला.
या दौऱ्याच्या पाहणीत कण्हेर पाणी योजनेतील शाहूपुरी येथील आठ लाख लीटर पाण्याची टाकी, पेढयाचा भैरोबा येथील जलशुद्धीकरण केंद्र, तसेच कण्हेर योजनेच्या उपसा पंपगृहाची पाहणी झाली. दरम्यान नगरपालिकेच्या शाहूपुरी येथील विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांनी प्रस्तावित क्षेत्रात नागरिकांना येणाऱ्या पाण्याच्या अडचणी सविस्तरपणे मांडल्या . जलशुध्दीकरण केंद्रातील सेट लिंक टँक, फिल्टर बेड, स्टोअरिंग टँक, तसेच इतर पंपगृहातील सुविधांची पाहणी माधवी कदम व सीता हादगे यांनी केली.
काय आहे कण्हेर योजना ?
2015 मध्ये प्रस्तावित झालेल्या कण्हेर योजनेचे काम 31 मे पर्यंत पूर्ण होणार असून, कृष्णा उद्भवातील 4500 नळ कनेक्शन कण्हेर योजनेकडे हस्तांतरित होणार आहे. याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता सतीश अग्रवाल यांनी दिली .मूळची 31 कोटी 31 लाख योजनेची सुधारित किंमत 42.98 कोटी रुपये असून कण्हेर धरण ते शाहुपुरी या दरम्यान साडेदहा किलोमीटरची पाईपलाईन करण्यात आली आहे. पंपगृहात दीडशे एचपी चे तीन पंप व एक पंप स्टँन्ड बाय ठेवण्यात येणार आहे. येथील विद्युतीकरणाच्या व्यवस्था व इतर किरकोळ तांत्रिक बाबींसह ही योजना 31 मे अखेर पूर्ण करण्यात येत आहे . एक महिना ट्रायलचा वगळता 1 जुलै पासून शाहुपुरीकरांच्या घरात कण्हेर योजनेचे पाणी प्रत्यक्षात पोहचणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.