विशाल कदम / सातारा
उद्योग उभारणीला दिलेली जागा उद्योग न उभारताच परस्पर घशात घालण्याचा प्रकार सातारा येथील करंजे एमआयडीसीत घडला आहे. या प्रकरणावर वारंवार चर्चा होऊन ही पालिका प्रशासन कुंभकर्णी झोप घेत आहे. 2002 च्या डिसेंबरमध्ये गलका झाला तेव्हा पालिकेत 8 जानेवारी 2003 च्या सर्वसाधारण सभेत ठराव झाला होता. परंतु कार्यवाही शून्य झाली. भाडेकरू मालामाल झाले तर पालिका कंगाल बनली असून यात नेमकी कोणी आपल्या भातावर डाळ ओढली हे सुज्ञ साताराना चांगले ज्ञात आहे. पालिकेच्या विरोधात न्यायालयात दावे दाखल असून एका दाव्यामध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शासनच फुकटच कुठं काय मिळते आणि आम्ही ते लगेच उचलतो असे सूत्र असणारे उचलेगिरी करणारे सातारा शहरात आहेत.
करंजे एमआयडीसी भूखंड प्रकरणात अनेकांनी आपला डाव साधला. 30 वर्षाचा भाडे करार संपला तरीही पालिकेचे लक्ष नव्हते. कुंभकर्णी झोप पालिकेची सुरू होती.भाडे करुनी परस्पर भूखंड परस्पर हस्तांतरण केले.या बाबीचा 2002 च्या डिसेंबरमध्ये गलका झाला.तेव्हा पालिकेच्या जानेवारी 2003मध्ये सर्वसाधारण सभेत विषय चर्चेला आला. त्या वर्षीच्या रेडी रेकनर नुसार एकूण जागेच्या किमतीपैकी 50 टक्के रक्कम वसूल करण्याचे ठरले होते. परंतु पालिकेच्या स्थावर जंगममध्ये नेमकी काय कार्यवाही झाली किती कर वसूल केला? ही चिंतेची बाब आहे. त्यावेळी जुन्या भूखंडधारकांची नावे कमी करून नवीन नावे हस्तांतरण करण्यास पालिकेत मंजुरी दिली होती. परंतु त्याचा शासनाकडे मंजुरीचा प्रस्तावच पाठवला नव्हता. त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी यांनी जागेची पाहणी केली होती. भाडे पट्टा धारकांनी प्रत्यक्ष जागे पेक्षा जास्त जागा वापडल्याची बाब निदर्शनास आली होती. पोट भाडे करू ठेवल्याची बाब उघडकीस आली होती.
नगरपालिका अधिनियम 1965 चे कलम 92 चा भंग केल्याची बाब निदर्शनास आली होती. परंतु अशा चुकीच्या घटना घडत असताना कणखर भूमिका पालिका प्रशासनाने घेणे गरजेचे होते.मात्र, तसे न करता चोरालाच उचलू लागण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे करंजे एमआयडीसीतल्या 58 भूखंडावर भलतेच शिरजोर होऊ लागले आहेत. शासनाची जागा ढापण्याचा प्रकार सुरू आहे.पालिकेचा स्थावर जंगम विभाग कित्येकदा चुकीच्या कामामुळे चर्चेत राहिला आहे.
करंजे एमआयडीसी आहे कुठे?
सातारा शहराचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी 1983 मध्ये करंजे एमआयडीसी म्हणून शासनाची जागा भाडे पट्याने दिली होती. मात्र, ज्यांनी भूखंड भाडे पट्यावर कराराने घेतले त्यांनी कारखाने उभे केलेच नाहीत. त्यामुळे आज ही सातारकराना ही एमआयडीसी कुठे आहे असा प्रश्न पडतो. हा प्रश्न किचकट बनवला गेला आहे.सातारा शहरालगतच्या जुनी आणि नवी एमआयडीसी सगळ्यांना माहिती आहेत. परंतु करंजे एमआयडीसीतला सर्व्हे नंबर 408,409,410 भूखंड प्रत्यक्ष जागेवर गेल्यावर जुना असलेला बोर्ड ही पहायला मिळतो.
न्यायालयात पालिकेच्या विरोधात दावे दाखल
चुकीचा प्रकार होत असल्याने सुज्ञ सातारकर गप्प बसतील कसे. पालिकेने झोपेचे सोंग घेतल्याने पालिकेला जागे करण्यासाठी उच्च न्यायालयात पालिकेच्या विरोधात दावे दाखल करण्यात आले आहेत. काहींचा निकाल लागला आहे तर काहींची सुनावणी सुरू आहे. पालिकेसमोर पेच असून कार्यवाही कासवगतीने कागदी घोडे नाचवण्याची सुरू आहे.