प्रतिनिधी/ सातारा
गेल्या महिन्यापासून कडक लॉकडाऊन पाळा अशा सूचना प्रशासन करत होते. मुंबईवरुन आलेल्यांनी घराबाहेर पडू नका असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह वारंवार करत होते. मात्र, एक महिन्यानंतर आता सातारा जिल्हा रेड झोनमध्ये गेला असून कोरोनाबाधितांची संख्येने पंचाहत्तरी गाठलीय. दररोज कोरोना बाधित समोर येत असल्याने आता 100 टक्के लॉकडाऊन पाळण्याशिवाय कराड व सातारा शहरासह तालुक्यांना पर्यायच उरलेला नाही. कराड शहर व परिसर तसेच सातारा शहर परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आले असून आता अत्यावश्यक सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. गल्लीबोळे देखील बांबूंच्या सहाय्याने अडवण्यात आल्याने कराड व साताऱयात सन्नाटा आहे.
महिन्यापूर्वी सातारा जिल्हय़ात कोरोना बाधितांची संख्या नगण्य होती. त्यावेळी प्रशासन नागरिकांना लॉकडाऊन पाळा, गर्दी करु नका असे सांगत होते. नागरिक बिनधास्त होते. शेवटी ठराविक वेळेत दुकाने सुरु झाली तरीही दुकानांवर नागरिकांची गर्दी असायची. सोशल डिस्टन्सचा तर सातारा व कराडात बोजवाराच उडवून टाकला होता. युवकांना तर लॉकडाऊनचे गांभीर्यच जाणवत नव्हते तर ग्रामीण भागात आलेल्या मुंबईकरांनी गावातील सगळय़ा कोंबडय़ा, बोकडांवर येथेच्छ ताव मारण्यास सुरुवात केली होती. यात्रा, जत्रा बंद करण्यात आल्या होत्या तरी चोरचुपके मटणाचा रस्सा शिजत होता.
एप्रिलमध्ये कोरोनाचा कहर काय असतो याची जाणीव प्रथम कराडला झाली. कारण कराड शहरात कोणीही कोरोना बाधित नव्हते तरी जवळपासच्या गावांमध्ये त्याची होत असलेली लागण पाहता एप्रिलच्या महिनाअखेरीस कराड 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आले. कराडमध्ये वाढणारी बाधितांची संख्या अंगावर काटा आणत असून त्यातही बरे होवून घरी जाणारे रुग्ण थोडा दिलासा देत आहेत. कराडकरांना लॉकडाऊन केल्यानंतर साताऱयातील जिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचारी तसेच नर्स बाधित आढळून आली तर मुंबईहून आलेला साताऱयातील प्रतापगंज पेठेतील युवक बाधित निघाल्याने मग प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने ज्या ज्या परिसरात रुग्ण आढळून आले त्या परिसरातील एक कि. मी. परिसर प्रतिबंधित घोषित करुन टाकला आहे.
एप्रिलमध्ये सातारा व कराडमधील नागरिकांना किराणा दुकाने, भाजीपाला, दूध मिळत होते. मात्र त्यावेळी देखील शिस्त पाळली जात नव्हती. आता प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळणेही दुरापास्त झाले आहे. लॉकडाऊन पूर्वीपेक्षा कडक झाल्याने आणि बाधित रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाने कराड व सातारा शहरातील गल्लीबोळासह सर्वत्र नाकेबंदी केली असल्याने नागरिकांना घरातच बसून राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
अत्यावश्यक सेवा देखील दुरापास्त
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने फक्त दवाखाने व नर्सिंग होम सुरु आहेत. पेट्रोल व डिझेल फक्त शासकीय व अत्यावश्यक सेवांना मिळत आहे. प्रांताधिकाऱयांनी घरपोच सेवा देण्यासाठी मेडिकल व किराणा दुकांनाची यादी जाहीर केली असली तरी दुकानदारांकडे प्रत्येकाच्या घरात जावून साहित्य पोच करण्याची कोणीतीही व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीवर दिवस काढावे लागणार आहेत.
मेडिकल दुकाने काही वेळ उगडा
मेडिकल दुकानदारांना तसेच दूध विक्रेत्यांना नेमून त्यांची लिस्ट फोन क्रमांकासह पोहोचवली असली तरी या वितरणात अडचणी आहेत. मेडिकल दुकानदारांकडे औषधे पोहोच करण्याची कोणतीही सुविधा नाही. काही वेळ ही दुकाने उघडी ठेवल्यास ज्यांना आवश्यक आहे ते फक्त औषधे घेवू शकतील. 100 टक्के लॉकडाऊनमुळे अनेकांच्या जेवणाचे हाल सुरु झाले आहेत. नाकेबंदी कडक केल्याने काहींना जेवण आणण्यासाठी घरी देखील जात येत नाही, असेही प्रकार समोर येवू लागले आहेत.
नाकाबंदीमुळे शहरात सन्नाटा, रस्ते साताऱयासह कराड शहरात ज्या ज्या भागात बाधित रुग्ण आढळले तो सर्व परिसर प्रतिबंधित करण्यात आल्याने त्या भागात प्रवेश करण्यासाठीचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सध्या तरी बाहेरच पडू नये. रस्त्यावर फक्त पोलीस, बॅरिकेट्स अन मोकळे रस्ते या व्यतिरिक्त काहीही पहावयास मिळणार नाही. बाहेर पडलाच तर चौकशी व कारवाई त्यामुळे अत्यावश्यक कारण असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे अशी स्थिती आहे.