प्रतिनिधी/कराड
येथील शनिवार पेठेतील मिळकतीला वारस नोंद करण्यासाठी 13 हजारांची लाच मागून दहा हजारांची लाच स्वीकारताना भूमापक उप अधीक्षकासह त्याच्या सहाय्यकास रंगेहाथ पकडले. आज, बुधवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईने भूमिअभिलेख कार्यालयातील कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वैभव चंद्रकांत पाटील, (वय-३७ वर्षे, पद- परिरक्षण भूमापक, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, कराड, रा. साई रेसिडेन्सी, मलकापूर), श्रीधर संजय माने (२५ वर्षे, खाजगी मदतनीस, रा. वाघेरी ता. कराड) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
तक्रारदाराच्या चुलत चुलत्याचे सर्व्हे नंबर ६१ ब व ६१ क, शनिवार पेठ, कराड या मिळकतीवर वारसदारांची नोंद करून देण्यासाठी १३ हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती १० हजार रुपये लाच संशयित आरोपी वैभव पाटील यांनी रक्कम स्वीकारली. तसेच आरोपी श्रीधर मने यांनी लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन देऊन साहाय्य केले. या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलीस अधीक्षक .राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार संजय साळूंखे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले यांनी कारवाई केली.