आगाशिवनगरच्या त्रिमुर्ती कॉलनीत विमानाची प्रतिकृती
प्रतिनिधी / कराड
कोरोनाच्या संकटात देखील योग्य ती काळजी घेत सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. आकाशदिव्यांनी परिसर उजळून निघू लागला आहे. आगाशिवनगर ता. कराड येथील त्रिमुर्ती कॉलनीतील निवृत्त शिक्षकाने जुन्या काळातील आठवणींना उजाळा देणारा तब्बल पंधरा फुटी आकाश दिवा साकारला आहे. गेल्या आठ दिवसांपासून परिश्रम घेत विमानाची प्रतिकृती असलेला हा आकाशदिवा पुर्ण करत आणला आहे. त्रिमुर्ती कॉलनीत लावण्यासाठी तयार झालेला हा आकाशकंदिल लक्षवेधी ठरत आहे.
दिवाळी म्हटले की आकाशदिव्यांची रोषणाई सर्वत्र असते. काळाच्या ओघात आकाशदिव्यांची प्रतिकृतीही बदलत गेली. प्लॅस्टिकचा वापर असलेले आकाशदिवे बाजारात दिसू लागले. त्यामुळे पारंपारिक कागदाच्या आकाशिदिव्यांचा झगमगाट विस्मरणात जाऊ लागला.
आगाशिवनगरच्या त्रिमुर्ती कॉलनीतील विजयकुमार भंडारे व शारंघ भंडारे यांनी पारंपारिक कागदाचा आकाशदिवा तयार करून पर्यावरणाचा र्हास रोखला आहे. कळकाच्या बांबुच्या कांब्या तयार करून त्यांनी विमानाची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीला रंगीत कागद चिटकवण्याचे काम गेले आठवडाभर सुरू आहे. या कामात त्यांना आलम मुल्ला, प्रल्हाद साळुंखे,विलास भंडारे, संपतराव कुराडे, बाबासाहेब ढेबे, शंकरराव मोरे यांचे सहाकार्य मिळत आहे. हा आकाशदिवा साकारण्याचे काम पुर्ण होत आहे. कागदापासून बनवलेला हा आकाशदिवा लक्षवेधी ठरत आहे.