प्रतिनिधी / भुईंज :
भिरडाचीवाडी (ता. वाई) काट्याच्या फेसात बेवारस पुरुष जातीचे अर्भक सापडले. जागरुक नागरिकांनी त्याला जीवदान देत दवाखान्यात आणले. मुलगा असूनही त्याला फेसात का टाकले असा प्रश्न पाहणारे सर्वजण व्यक्त करत होते. या मुलाची आई कोण हे शोधण्याचे आव्हान भुईंज पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, भिरडाचीवाडी येथील एका ऊसाचे शेतात ऊस तोडणी सुरु असताना ऊस तोड मजूर अमोल प्रकाश काकडे हा लघुशंकेसाठी गेला असता त्याला काट्याच्या फेसात लहान बाळ रडत असल्याचे निदर्शनास आले. त्याने लगेचच किसन वीर कारखाना सुरक्षा विभागाचे अधिकारी राहुल शिंदे व सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल शिंदे यांना कळवून सदर बाळाला काट्यातून बाजूला काढले व रक्ताने माखलेल्या अर्भकास ताब्यात घेवून उपचारासाठी भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केद्रांत दाखल केले.
याच दरम्यान भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे, पी एस आय रत्नदीप भंडारे, पोलीस हवालदार दत्तात्रय धायगुडे, हवालदार विकास गंगावणे, आनंदराव भोसले, पोलीस हवालदार सुनील पोळ, रविराज वर्णेकर, अमोल बागल, राजेश कांबळे आदीनी घटनास्थळी जाऊन याबाबत शोध मोहीम राबविली. त्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, अर्भकाला पुढील उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हास्पिटल पाठवण्यात आले आहे.
भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केद्रांतील डॉ. महादेव वाघमोडे, डॉ.उज्वला इंगळे, आरोग्य सुपरवायझर जयश्री भोसले, स्नेहप्र्भा नलवडे, शिल्पा दाभाडे, कल्पना मुळीक, राजेंद्र पांडरपोटे, मोहमद युसूफ इनामदार, सचिन सोनवणे, हणमंत चव्हाण आदींनी याबाळाची सुश्रशा केली.