प्रतिनिधी / नागठाणे :
काशीळ (ता.सातारा) येथील नव्याने उभारणी केलेल्या ग्रामीण रुग्णालयाची मोठी इमारत बांधून तयार आहे. या इमारतीचा कोविडच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी लवकर वापर करावा, अशी मागणी येथील जनतेतून केली जात आहे.
या इमारतीची पहाणी जुलै २०२० मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती, त्यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकीत्सक अमोद गडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, सरपंच सुभाषराव जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.त्यावेळी आठच दिवसात या रुग्णालयाच्या इमारतीचा कोविड सेंटर म्हणून वापर करण्यात येईल असे मोठा गाजावाजा करून सांगण्यात आले होते.मात्र प्रत्यक्षात काही काळानंतर ही घोषणा हवेतच विरली गेली.
या रुग्णालयाच्या उभारणीला सहा वर्षे होवून गेले असून सध्याच्या परीस्थितीत आयसीयूचे सुमारे ५० च्या आसपास बेड उपलब्ध होऊ शकतात. तसेच मोठ्या प्रमाणात जनरल बेडही तयार होऊ शकतात. शेंद्रे ते उंब्रज परिसरातील सर्व गावांसाठी काशीळ येथील हे ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर म्हणून मध्यवर्ती व सोयीचे ठरणार असून, येथे कोविड सेंटर उभारल्यास येथे ग्रामीण रुग्णाची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर म्हणून जमतेसाठी खुले करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील जनतेतून होत आहे.