ऑक्टोबरमध्ये ऊगवणारी फुले चक्क ऑगस्टमध्ये
वार्ताहर / कास
वाचून आश्चर्य वाटेल पण जागतिक वारसा स्थळ व जैवविविधतेचे आगार असलेल्या कास पठाराच्या फुलांच्या जीवनमानात बदल होत असून चक्क ऑक्टोबरमध्ये ऊगवणारी फुले ऑगस्ट मध्ये आली असून या वर्षी पठारावर ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये गेंद, सितेची आसव ईत्यादी फुले ही अद्याप फुललेली नाहीत. त्यामुळे कासच्या फुलांच्या जीवनमानात काही बदल होतोय का याबाबत अभ्यास करण्याची गरज आहे.
कास पठार ते राजमार्ग या रस्त्याच्या उजव्या बाजूला अडीच हेक्टर परिसरात कुमुदिनी तलाव पसरलेला आहे. या तलावामध्ये कुमुदिनी (निम्फॉईडस इंडिकम) ही पृष्ठभागावर आढळते. तर पाण्याच्या तळाला रोटाला ही वनस्पती आढळते. कुमुदिनी तलावाला सरोवर तलाव ही म्हटले जाते. या वर्षी कासच्या वातावरणात काय बदल झाला काय माहीत पण या कुमुदिनी तलावातील ऑक्टोबर मध्ये ऊगवणारी फुले चक्क ऑगस्ट मध्ये ऊगवली आहेत. पहिल्यांदाच हा बदल घडला असून याबाबत स्थानिक संशोधक ही आश्र्चर्य व्यक्त करत आहेत.
या तलावामध्ये पाणभोपळी नावाची वनस्पती आढळते. यालाच कुमुदिनी किंवा छोटे कमळ असे म्हटले जाते. याची पाने पाण्यावर तरंगतात. त्याच्यावर पांढरी केसरयुक्त फुले येतात. याची मुळे पाण्यातून माती भागापर्यंत अन्न शोषण्यासाठी तरंगतात. उन्हाळ्यात पाणी आटून गेल्यावर मुळ्या व कंद जमिनीमध्ये सुकून जातात. पुनः पावसाळा आला की ही वनस्पती जीवंत होते. संपूर्ण तलावावर ही वनस्पती पसरलेली आहे. या वनस्पतीच्या जाळीतून तलावातील पाणी पण दिसत नाही. कुमुदिनीला बहर आल्यावर संपूर्ण तलाव पांढराशुभ्र दिसतो. जणू काही तलावावर पांढऱ्या कमळांची चादर चढवल्याचा आभास तयार होतो.
अत्यंत दुर्मिळ असणारी ही फुले पाहण्याचा वेगळाच आनंद मिळतो. पण ऑगस्टमध्ये कुमुदिनी तलावातील फुले फुलल्याने नक्की ही घटना फुलांसाठी चांगली आहे. की नुकसानदायक हे नंतरच कळणार आहे. कास चा हंगाम पंचवीस ऑगस्टपासून चालू झाला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतसाली बंद असणारा हंगाम यावर्षी चालू झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पर्यटक चांगली गर्दी पठारावर करत आहेत. कास पठार कार्यकारी समिती मार्फत हंगामाचे नियोजन चांगले झाले असून पर्यटक फुलांचा आनंद घेताना दिसत आहेत.