दरड कोसळल्या, पाणी रस्त्यावर
वार्ताहर / कास
बुधवारी रात्री पासून कास, बामणोली व तापोळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. या पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तर ओढ्यांचे पाणी मोर्यांमधे न बसल्याने रस्त्यावर आले. संरक्षक भिंतीचे नुकसान झाले. भातांच्या रोपांमध्ये मातीचा भराव आल्याने रोपे गाढुन गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
कास परिसरातील प्रसिद्ध असणारा एकीव चा धबधबा ओसंडून वाहत होता. पाणी ईतके प्रचंड होते की ते पाणी एकीव सातारा या डांबरी रस्त्यावर आले. महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर तापोळा रोडवर वाघेरा या ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळली. स्थानिकांनी दगड, माती हलवून रस्ता पूर्ववत करन्याचा प्रयत्न केला.कास अंधारी रोडवरील मोऱ्यां भरून रोडवर पाणी आल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली तर तापोळा येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत ढासळली.
सांगवी त मेढा गावात ओढ्याचे पाणी घुसल्याने शेतांचे बांध व ताली पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले.काही दिवसांपूर्वी मेढा केळघर रोडवर मामुर्डी गावच्या हद्दीत मोठ्या पावसाने मुख्य रस्ता वाहून गेला होता. त्या ठिकाणी ठेकेदाराने नुकत्याच मोठ्या मोर्या बसवल्या होत्या. त्या मोर्यांची तोंड ओढ्याकडे न करता शेताकडे केल्याने या मोर्यांतील पाणी शेतात जावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मेढा सातारा रस्त्यावर ही अनेक ठिकाणी पाणी साचले होते. सह्याद्रीनगर येथील रस्त्यावर ही पाणी येवून रस्त्याचे नुकसान झाले आहे.