प्रतिनिधी / खंडाळा
बहुजन समाजाच्या न्याय, हक्क लढ्यासाठी खंडाळ्यात 1 डिसेंबरला मोर्चाचा निर्णय तालुका बहुजन संघर्ष हक्क समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे तालुका बहुजन संघर्ष हक्क समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये एक डिसेंबरला खंडाळ्यात मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले. त्याच बरोबर दिनांक 14 ऑक्टोबर रोजी पिसाळवाडी येथे झालेल्या बहुजन हक्क परिषदेत केलेल्या ठरावाच्या अंमलबजावणी करणे करीता नियोजन करण्यात आले. त्याकरिता तालुक्यातील सर्व बहुजन समाजातील प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून पुढील रूप रेषा कशी असावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. बहुजन समाजाचे एकत्रितपणे संघटन करित शासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात यावे असे ठरले. त्यासाठी तालुक्यात गावोगावी बैठक घेऊन जनजागृती, नियोजन करणे करीता निर्णय घेण्याचे अधिकार समितीला देण्यात आले.