अनैतिक संबंधावरुन खून :2015 सालातील घटना
प्रतिनिधी / सातारा
सोनगाव बंगला, ता. फलटण येथे दि. 16 सप्टेंबर 2015 रोजी अनैतिक संबंधांच्या कारणातून झालेल्या एकाच्या खूनप्रकरणी त्याच गावातील आरोपी अकुंश दाजी चव्हाण (वय 60) याला जिल्हा न्यायालयातील चौथे अतिरिक्त विशेष न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांनी मंगळवारी अंतिम सुनावणीत जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्याची हकीकत अशी, 16.9.2015 रोजी ही घटना सोनगाव बंगला, ता. फलटण येथे यातील मयत बाबासो केशव भोसले हे सलूनच्या दुकानाबाहेर बाकड्यावर बसले होते. अनैतिक संबंधाच्या कारणातून आरोपी अकुंश चव्हाण यांनी पाठीमागून येवून भोसले याच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटवून दिले होते. त्यामध्ये ते गंभीर भाजून जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी आरोपी चव्हाण याने खूनानंतर साक्षीदार देवेंद्र राजेंद्र पाटोळे रा. सोनगाव बंगला, ता. फलटण यांचे घर पेटवून दिले होते.
फलटणचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपड यांनी या गुन्हयाचा उत्कृष्ठ तपास करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावा प्राप्त करुन मुदतीत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याच्या अंतिम सुनावणीत दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी चव्हाण याला जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
खटल्याच्या सुनावणीमध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून ऍड. लक्ष्मणराव खाडे यांनी काम पाहिले असून त्यांना पैरवी अधिकारी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक मुस्ताक शेख, प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव शिवाजी घोरपडे, सहाय्यक फौजदार घारगे, हवालदार शेख, शिंदे, बेंद्रे, पोलीस नाईक शिंदे, कुंभार, भरते, घोरपडे यांनी मदत केली आहे.