शहरातील विसर्जन प्रक्रिया नऊ वाजताच पडली पार, पालिकेच्या मंडळाचा गणपतीचे विसर्जन उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या हस्ते, नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी केली विसर्जन ठिकाणी पाहणी, मानाच्या गणपतींनी साधेपणाने केले विसर्जन
सातारा / प्रतिनिधी
दरवर्षी सातारा शहरात गणेश विसर्जन सोहळा अगदी थाटात होत असे. यावर्षी अगदी साधेपणाने विसर्जन गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात करण्यात आले. शहरातला विसर्जन कार्यक्रम रात्री नऊ वाजताच शांततेत पार पडला.आलेले कोरोनाचे संकट लवकर जाऊ दे प्रार्थना करत विसर्जन करण्यात आले.पालिकेच्या मंडळाचा गणपतीचे विसर्जन उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी विसर्जन तळ्याच्या ठिकाणी जाऊन भेट दिली.मानाच्या गणपतीचे विसर्जन परंपरा राखत पार पडले.
सातारा शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहाने ढोल ताशा, पारंपरिक वाद्यात मिरवणूक काढून विसर्जन मिरवणुकीत रंगत भरली जात असते.पहाटे चार वाजेपर्यंत मिरवणूक चालते असते.ठिकठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांना स्वागत करण्यासाठी नेते व संस्थाचे कार्यकर्ते उपस्थित असतात.मात्र, यावर्षी कोरोनामुळे अगदीच साधेपणाने मिरवणूक न काढता विसर्जन करण्यात आले.सकाळपासून शहरात सार्वजनिक आणि घरगुती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली.पौर्णिमा असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करत मोजक्या कार्यकर्त्यांनी बाप्पा मोरयाचा गजर देत विसर्जन करण्यात आले.
गणेश विसर्जनासाठी शहरात बुधवार नाका, पोहण्याचा तलाव, दगडी शाळा, हुतात्मा स्मारक येथे व्यवस्था करण्यात आली होती.बुधवार नाका येथे गणपती घेऊन एका ट्रॉलीतून पुढे तळ्यात नेऊन क्रेनने विसर्जन करण्यात येत होते.विसर्जन ठिकाणी सातारा शहर आणि शाहुपुरी पोलिसांचा बंदोबस्त होता.पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी कार्य करत होते.संगम माहुली येथे कृष्णा नदीच्या तर उरमोडी नदीवर शहापूर येथे काही गणेशभक्तांनी विसर्जन केले.
यावर्षी मानाच्या गणपतीचे पावणे नऊ वाजता विसर्जन
सातारा शहरात दरवर्षी मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला दुपारी चार वाजता सुरुवात होत असायची.आणि पहाटे सहा वाजता संपायची.यावर्षी पोलिसांनी केवळ अर्धा तासाची परवानगी दिली होती.त्यामुळे पालिकेचा गणपती सायंकाळी सहा वाजता बाहेर काढण्यात आला.तेथून बाजूलाच असणाऱ्या पोहण्याच्या तलावात उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले.त्यानंतर मानाच्या गणपती मार्गस्थ झाले.पाचशे एक पाटीपासून बुधवार नाका तळ्यावर गणपती पोहचले.विसर्जनाला मानाचा गणपती शिवपार्वती गणपतीचे पाऊने नऊ वाजता नगराध्यक्षा माधवी कदम, शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी दर्शन घेवून गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात विसर्जन करण्यात आले.