सजावट, मिठाई, पूजा साहित्य खरेदीसाठीही ई-मार्केटला पसंती
प्रतिनिधी / सातारा
कोरोनामुळे प्रवासावर असलेले निर्बंध आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांनी ऑनलाईन खरेदीकडे आपला मोर्चा वळविला आहे. सजावट, मिठाई, पूजा साहित्य खरेदीसाठी ई-मार्केटला अधिक पसंती दिली जात असल्याचे दिसून आले आहे.
चालूवर्षी कोरोनाच्या संकटामुळे अनेक सार्वजानिक गणेश मंडळांनी मंडपांमध्ये मोठया प्रमाणावर उत्सव साजरा करण्याचे रद्द केले आहे. तर दरवर्षी प्रमाणे यंदा घरगुती गणपती साध्या पद्धतीने सजावट करून उत्सव साजरा करत आहेत. यंदाच्या वर्षी स्नॅपडिलवर पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या विक्रीत खूप मोठी वाढ झाली आहे.
एलईडी लाईट्स, रांगोळी स्टेन्सिल्स, दिवे, तोरणे आणि भिंतीवर लावण्याच्या सजावटीच्या वस्तू यांची विक्री मोठया प्रमाणावर होत आहे. तुपातील वाती, पूजा साहित्यांचे कॉम्बो, पितळी व ऍल्युमिनियमचे दिवे, अगरबत्या, धूप, आरती थाळी इत्यादी साहित्य देखील विक्रीत अग्रेसर आहे. गणरायाच्या आगमनाबरोबरीने घरामध्ये भक्तिमय, संगीतमय वातावरण निर्मिती व्हावी यासाठी ब्ल्यूटूथ स्पीकर्स, मंजिरा व ढोलकी यासारखी छोटी, पारंपारिक वाद्येs देखली विकत घेतली जात आहेत. तरूणासह जेष्ठांमध्येही ऑनलाईन शॉपिगची क्रेझ वाढलेली आहे.