नागठाणे / प्रतिनिधी :
गांजा विक्रीसाठी निघालेल्या दोघांना बोरगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 16,500 रुपये किंमतीच्या 4 किलो गांज्यासह एक दुचाकी व तीन मोबाईल्स असा 44 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी अपशिंगे (मि.) गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी बाळू हणमंत चव्हाण (वय 43, रा.सातारा रोड, ता.कोरेगाव) व नाना महादेव मसगुडे (50, रा.अपशिंगे (मि.) ता. सातारा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्यांना अटक केली.
बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपशिंगे (मि.) गावच्या हद्दीतून दोघेजण गांजा विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना गुरुवारी मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास पोलिसांनी अपशिंगे (मि.) ते देशमुखनगर जाणाऱ्या रस्त्यालगत वाघजाई मंदिराजवळ सापळा रचला. यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोघांची चौकशी करत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांना या दोघांजवळ एक प्लास्टिक पोते आढळले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्या पोत्यात गांजा आढळला. याबाबत अधिक तपास सपोनि डॉ.सागर वाघ करत आहेत.