प्रतिनिधी / नागठाणे
ग्रामसेवकास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कौंदणी (ता.सातारा) येथील पाचजणांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी ही घटना कौंदणी ग्रामपंचायतीत घडली.
प्रकाश ज्ञानू यादव, बजरंग प्रकाश यादव, विकास जयसिंग यादव, विलास जयसिंग यादव व जगन्नाथ नारायण यादव(सर्व.रा.कौंदणी,ता.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी कौंदणी गावचे ग्रामसेवक निलेश विनायक गुरव (रा.मांडवे,ता.सातारा) हे ग्रामपंचायतीत कामकाज करत असताना प्रकाश यादव, बजरंग यादव, विकास यादव विलास यादव व जगन्नाथ यादव हे कार्यालयात आले. त्यांनी नळाची पाणीपट्टी, घरफळा भरणार नाही असे म्हणून अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी त्यांची कॉलर धरून धक्काबुक्कीही करत जन्म-मृत्यूचे रजिस्टरही उचलले. सरपंच लक्ष्मण यादव यांनी ते रजिस्टर पुन्हा ताब्यात घेतले.
सोमवारी रात्री उशिरा ग्रामसेवक निलेश गुरव यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार वसंतराव जाधव करत आहेत.