प्रतिनिधी / सातारा :
खा. उदयनराजे भोसले यांनी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केल्यानंतर या मार्गाने वाहतूक वेगाने सूरू आहे. यावेळी अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे आवश्यक त्याठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. वाहतूकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सार्वजानिक बांधकाम विभाग व पोलीसांना दिल्या. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनीही ग्रेड सेपरेटरची पाहणी केली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन पालकमंत्री व लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत लवकरच करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सोमवारी सकाळी ग्रेड सेपरेटर कामाची पाहणी केली. यावेळी खा. उदयनराजे भोसले, पोलीस अधीक्षक अजय बन्सल, मुख्याधिकारी अभिजीत बापट, सार्वजनिक बांधकाम व वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.
शेखर सिंह यांनी सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने ग्रेड सेपरेटर कामाची पाहणी करून काही सुचना बांधकाम विभागाला केल्या. ग्रेड सेपरेटरमध्ये चार रस्ते एकत्र येतात. वाहनधारकांना योग्य दिशेने जाता यावे, यासाठी ग्रेड सेपरेटरमध्ये आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. तसेच हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. कोरेगावच्या दिशेला असलेल्या भुयारी मार्गावर बॅरिक्टेस् लावावेत. वाहतुकीवर पोलिसांनी लक्ष ठेवावे. त्यानंतरही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना ही शेखर सिंह यांनी केली. खा. उदयनराजे यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर संबंधित विभागांकडून कामे हाती घेण्यात आली.