प्रतिनिधी / नागठाणे
सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येकजण आपापल्यापरीने मदतकार्यासाठी हातभार लावत आहेत. त्यांच्याच आदर्शाचे अनुकरण करताना एका चिमुरड्याने खाऊसाठी मिळालेल्या पैशाचा विनियोग कोविड रिलिफ फंडासाठी मदत म्हणून केला आहे.
अरिंजय महामुलकर असे त्याचे नाव आहे. तो गुरूकुल शाळेत शिकत आहे. अरिंजय महामुलकर विलासपूर (फॉरेस्ट कॉलनी) येथे राहतो. कोरोना रिलिफ फंडाविषयीच्या बातम्या त्याच्या वाचनात आल्या. त्यामुळे खाऊसाठी मिळालेले पैसे त्याने पालकांच्या संमतीने फंडासाठी देण्याचे ठरविले.
या रकमेचा धनादेश त्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. अरिंजयने गेल्यावर्षीही कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना लायन्स क्लबच्या माध्यमातून साठविलेल्या पैशांची मदत पाठविली होती. त्याच्या या संवेदनशीलतेचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.