दरोडा,अट्रोसिटी,विनयभंगाचे परस्परविरोधी गुन्हे दाखल
प्रतिनिधी / नागठाणे
जमीन वहिवटण्याच्या कारणावरून भाटमरळी (ता.सातारा) येथे दोन कुटुंबात मंगळवारी सायंकाळी जोरदार धुमश्चक्री उडाली. या घटनेची परस्परविरोधी फिर्यादी गुरुवारी पहाटे बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून पोलिसांनी सोळा जणांविरोधात दरोडा, अट्रोसिटी,विनयभंगासह रायटिंगचे गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत महेश हिंदुराव जाधव (वय.३४,रा भाटमरळी,ता.सातारा) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गावातील माळ नावाच्या शिवारात गट नं.१३६ मधील प्रकाश शंकर गायकवाड यांच्या शेतात फिर्यादी, त्याचे वडील हिंदुराव मुकुंदा जाधव,सालगडी श्रीकांत चरणदास सोनावले यांच्यासह रोजाने काम करणाऱ्या काही महिला काम करत असताना त्याठिकाणी मयूर नंदकुमार अवघडे,नंदकुमार गोविंद अवघडे,पिंटू गोपाळ अवघडे,मयूर अवघडे याची पत्नी , लिलाबाई गोपाळ अवघडे,जगन्नाथ विठ्ठल जाधव,विजय जगन्नाथ जाधव व दत्तात्रय जगन्नाथ जाधव तेथे आले. यावेळी दारू पिऊन आलेल्या मयूर अवघडे याने शिवारात काम करत असलेल्या एका महिलेच्या दंडाला पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. व इतरांनी सर्वांना मारहाण केली.
यावेळी वडील हिंदुराव जाधव यांच्या गळ्यातील एक तोळे वजनाची सुमारे ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरीने हिसकावून घेतली. यावेळी त्यांनी तुमच्यावर अट्रोसिटीची केस करतो, तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणून लाकडी दांडके व दगडाने मारहाण केली.जगन्नाथ विठ्ठल जाधव व विजय जगन्नाथ जाधव यांनी संगनमत करून या सर्वांना आम्हास मारहाण करण्यासाठी पाठवून जबरदस्तीने दत्तात्रेय जाधव यांनी आम्ही वहिवटत असलेल्या क्षेत्रात ट्रॅक्टर घालून पेरणी केली असे म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर दरोडा, विनयभंग व रायटिंगचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि डॉ.सागर वाघ करत आहेत.
तर नंदकुमार गोविंद अवघडे (वय.६०,रा.भाटमरळी,ता.सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील घडसकी गट नं.१३६ मध्ये गावातील हिंदुराव मुकुंदा जाधव,महेश हिंदुराव जाधव,दीपक तुलसीदास जाधव,विनायक मुकुंदा जाधव,कमल हिंदुराव जाधव,जयश्री दीपक जाधव,श्रीकांत चंद्रदास सोनावणे व एक अज्ञात पुरुष मजूर आमच्या आले पिकातील मिरच्या तोडत होते. त्यांना मिरच्या तोडण्यास अटकाव केला असता जातीवाचक शिवीगाळ करून आमचे काय वाकडे करायचे आहे ते कर. माझा मुलगा डी. वाय.एस.पी आहे असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्याने मारहाण केली असे म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयितांविरोधात अट्रोसिटीसह रायटिंगचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आंचल दलाल करत आहेत.