प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात कोरोना स्थिती भयान अवस्था आहे. बेड मिळाला नाही म्हणून वाई तालुक्यातील महिलेचा जीव गेल्याची घटना घडली. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनाही अनेक फोन येतात, बेडसाठी सहकार्य करा, रेमडेसीव्हीरसाठी सहकार्य करा, त्यांच्याकडून फोन करुन प्रत्येकाला सहकार्य केले जाते. मात्र, बेड नसूनही काही रुग्णालये पैशांची मागणी करतात. त्याचा अनुभव आल्याने त्यांनी लगेच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱयांकडे यावर तोडगा म्हणून कर्मचाऱ्यांकडूनच जिह्यातील 11 ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी पाच व्हटीलेटरचे बेड देण्याचा मनोदय मांडला. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेचे कर्मचारी आरोग्य यंत्रणेला 55 व्हेंटीलेटरचे बेड देणार आहेत.
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांचे सामाजिक कार्य नेहमी सुरु असते. कोरोना काळात स्वतः गतवर्षी अनुभव घेतल्याने ज्यांच्या घरी आजारपण येते त्यांची परिस्थिती काय होते हे त्यांनी पाहिले आहे. ते अनेकांना मदत करतात. अनेकांच्या मदतीला लगेच धावून जातात. त्यांचा फोन सतत सुरु असतो. मग कोणी खंडाळा तालुक्यातील असो किंवा कराड तालुक्यातील असो. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने त सतत प्रयत्न करत असतात. गेल्या दोन दिवसांपूर्वी असाच प्रसंग त्यांना अनुभवायला आला. एका रुग्णाच्या उपचारासाठी साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी बेडसाठी फोन केला. तर त्या हॉस्पिटलने 90 हजार पहिले भरा म्हणाले. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी प्रत्यक्ष त्या हॉस्पिटलला भेट दिली अन् पाहणी केली तर बेडच नाही. तेव्हा त्या हॉस्पिटच्या प्रशासनाला खूप झापडले अन् लगेच त्यांनी विचार केला की यावर आपण काहीतरी करु शकतो.
असे म्हणून लगेच कर्मचाऱयांची बैठक बोलवली. गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांना बोलवून त्यांना कोरोना काळात मदत करावी, प्रत्येकांने स्वेच्छेने दोन दोन हजार रुपये दिल्यास त्या त्या तालुक्यीतल ग्रामीण रुग्णालयात पाच पाच व्हेंटीलेटर बेड उपलब्ध करुन दिले तर आपल्या हातून चांगले कार्य होईल अशी संकल्पना मांडली अन् त्यास सगळय़ांनी चर्चेत सहभाग घेवून अनुमती दिली. दरम्यान, लवकरात लवकर या उपक्रमातंर्गत बेड जिह्यातील 11 ग्रामीण रुग्णालयात हे बेड देण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने आज बैठक झाली.