सातारा : सातारा जिल्हा बँकेने बँकिंग व नॉन बँकिंग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीमुळे बँकेला नाबार्डकडून ‘उत्कृष्ठ कार्यक्षमता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते झाले.
प्रामुख्याने शेतीसाठी कर्ज पुरवठ्यामधील सहभाग, वंचित घटकांना बँकिंग प्रवाहात समाविष्ट करणे, महिला सक्षमीकरण कामकाज, तंत्रज्ञानाचा अवलंब, बँकांची आर्थिक प्रगती, कर्जवितरण व कर्ज वसुलीमधील सातत्य, उत्कृष्ठ नफा क्षमता आदी निकष या पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले होते. या निकषांच्या पुर्ततेच्या आधारावर सातारा जिल्हा बँकेला नाबार्डकडून ‘उत्कृष्ठ कार्यक्षमता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.