प्रतिनिधी / सातारा :
युक्रेनमध्ये स्वस्त वैद्यकीय शिक्षण असते आणि तेथील पदवी भारतात चालते. त्यामुळे देशातील अनेक विद्यार्थ्यांचा कल हा युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याचा असतो. मात्र, सध्या युक्रेनवर रशियाने चारही बाजूने हल्ला चढवला आहे. या युद्धाच्या बातम्या जगात वाऱयासारख्या फैलावत आहेत. युक्रेनमध्ये भारतातील 20 हजार जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सात विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना भारतात सुखरुप आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राज्य व केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरु आहेत.
युरोपियन देशामध्ये वैद्यकीय शिक्षण स्वस्त असते, असे बोलले जाते. त्याकरता भारतातून अनेक विद्यार्थी तेथे जात असतात. सातारा जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी युरोपियन देशात शिक्षणासाठी जातात. नुकतेच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले आहे. रशियाने चारीबाजूने युक्रेनची कोंडी करत प्रमुख शहरावर हल्ला चढवला आहे, अशा बातम्या दाखवण्यात येत आहेत. त्या युक्रेनमध्ये सातारा जिल्ह्यातील सात विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना आपल्या देशात परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आशुतोष राजेंद्र भुजबळ हा ओडेसा येथे, राधिका संजय वाघमारे हे स्टेलेवराव स्ट्रीट झाफोरिझया येथे, सौरभ बाळासाहेब जाधव हा युक्रेनमध्ये अडकला असून तो माणचा आहे. योगिनी संदीप यादव ही बोगोमॉलेट्स नॅशनल मेडिकल युनिर्व्हसिटी किव्हे युक्रेनमध्ये, सुभाष द्विवेदी हा व्हीएन करझीन खरीव्ह नॅशनल युनिव्हर्सिटी येथे अडकला असून त्याचे नातेवाईक एमआयडीसीमध्ये राहतात. योगेश जयपाल महामुनी हा झोप्रोझिया येथे अडकला असून तो वडूजचा आहे. ओमकार जयसिंग शिंदे हा मेचिलकोव्हा स्ट्रीट एलव्हीआयव्ही सीटीत अडकला आहे. त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.