सातारा, प्रतिनिधी
जिल्हय़ाच्या कोरोनामुक्तीच्या लढय़ाला यश येत असून कोरोनामुक्त रूग्णांचा आकडा आता 500 कडे झेपावू लागला आहे. गुरुवारी दिवसभरात बाधितांची संख्या पंधराने वाढली. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या 700 चा टप्पा ओलांडत 703 झाली आहे. तर गुरूवारी दिवसभरात 29 नागरिक कोरोना केअर सेंटरमधून कोरोनामुक्त होऊन घरी गेल्याचा आनंद आरोग्य विभागाने दिला. जिह्यात आजपर्यंत 448 जण कोरोना मुक्त झाले आहेत. जिह्यात बाधित यांची एकुण संख्या 703 दिसत असली तरी आता फक्त 226 रुग्ण ऍक्टिव्ह असून या सर्वांवर आरोग्य विभाग उपचार करत आहे. क्रांतीसिंह नाना पाटील रूग्णालयाने गुरूवारी अभिमानास्पद कामगिरी करताना दोन बाधित महिलांची यशस्वी प्रसुती केली. विशेष म्हणजे त्यांची दोन्ही बाळे लक्षणे विरहित असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
गुरूवारी दिवसभरात दोन जण बाधित असल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर रात्री उशिराच्या अहवालात 13 जण बाधित असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यामुळे जिल्हय़ात एकुण बाधितांचा आकडा 703 झाला आहे.
दरम्यान, जिल्हय़ाचा कोरोनामुक्तीचा वेग वाढत असून तीन प्रमुख रूग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमधून बरे होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे केवळ 226 ऍक्टीव्ह रूग्ण असून 448 जण बरे झाले आहेत. आरोग्य विभाग अहोरात्र करत असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे.
नवजात चिमुकली बाळं लक्षणे विरहित
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाने अभिमानास्पद कामगिरीची नोंद केली. सातारा येथे दाखल असणाऱया जावली तालुक्यातील गवडी येथील 26 वर्षीय कोरोना बाधित महिलेची प्रसुती 30 मे रोजी झाली. बाळ व आई सुखरुप असून बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. तर माण तालुक्यातील बनवडी येथील कोरोना बाधित 25 वर्षीय गरदोर महिलेची 10 जून 2020 रोजी सकाळी सुरक्षित प्रसुती झाली आहे. बाळ व आई सुखरुप असून बाळ लक्षणे विरहीत आहे. डॉ. सुनील एम. सोनवणे, स्त्राr रोग तज्ञ वर्ग-1 व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत.
उरूलमध्ये मुंबईहून आलेला बाधित
पाटण तालुक्यातील उरूल येथील एकजण बाधित झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हा रूग्ण मुळचा ओंडोशी (ता. कराड) येथील आहे. मुंबईहून परतल्यानंतर ओंडोशी येथे प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे तो पाटण तालुक्यातील उरूल या आजोळ असलेल्या गावात गेला होता. तेथे त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने त्याला कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उरूल ग्रामपंचायतीने येथे साखळी वाढू न देण्याची खबरदारी अगोदरच घेतली आहे.
दरम्यान, सातारा शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल असणाऱया कोल्हापूर येथील 39 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना बाधित आल्याचे खासगी प्रयोगशाळेने कळविले आहे. तर रात्री पुन्हा 13 जण बाधित झाले आहेत.
कोरेगाव तालुक्यात वृद्धाचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी येथील 78 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला उच्च रक्तदाब व श्वसन संस्थेचा त्रास होता, असे आरोग्य विभागाने सांगितले. जिल्हय़ात मृत्यू झालेल्यांची संख्या 29 झाली आहे.
कोरोना सेंटरमधून 29 जणांना डिस्चार्ज
गुरूवारी जिल्हय़ातील विविध कोरोना केअर सेंटरमधून 29 नागरिकांना घरी सोडण्यात आले. लक्षणे नसलेल्या या रूग्णांना 10 दिवसांनंतर घरी सोडले आहे. यात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 4, बेल एअर, पाचगणी येथील 16, कोविड केंअर सेंटर, शिरवळ येथील 3, माण येथील 1, वाई येथील 1, रायगाव येथील 4 असे एकूण 29 जणांना रुग्णालयातून 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्तांचा आकडा 448 वर पोहोचला आहे.
158 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 12, पानमळेवाडी येथील 16, शिरवळ येथील 23, कराड येथील 29, वाई येथील 48, रायगाव येथील 2, मायणी येथील 16, महाबळेश्वर येथील 5, फलटण येथील 7 असे एकूण 158 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून जिल्हा रुग्णालय, सातारा व एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 22 जणांचे नमुने निगेटिव्ह आले असल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.
जिल्हय़ात गुरुवारपर्यंत
एकूण कोरोना बाधित 703
एकूण कोरोना मुक्त 448
बळी 29
गुरुवारी
एकूण कोरोना बाधित 15
एकूण कोरोना मुक्त 29
बळी 01