प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात कोरोनाचे संक्रमण कमी होत असताना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यापारी वर्गाला दिलासा देणारा निर्णय जारी केला आहे. 15 ऑक्टोबरपासून जिल्हय़ातील बाजारपेठेतील दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली आहे. गेले काही महिने दुकाने केवळ सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होती. मात्र दसरा, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर दुकाने रात्रीपर्यंत खुली ठेवण्याची मागणी होत होती. ती पूर्ण झाल्याने व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. याबरोबरच आठवडी बाजार, उद्यानेही सुरू होणार आहेत. गुरूवारी रात्रीच्या अहवालात 271 पॉझिटिव्ह, 276 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मृतांची संख्या घटत असून 9 मृत्यू झाले आहेत.
सोशल डिस्टन्स नसल्यास दुकान तात्काळ बंद करणार
दुकानदारांना रात्री नऊपर्यंत दुकान सुरू ठेवण्याची संमती देण्यात आली असली तरी सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. दुकानात 5 पेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसली तर दुकान तात्काळ बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मेडीकल पूर्णवेळ सुरू ठेवण्यासही संमती देण्यात आली आहे.
चित्रपटगृहे सुरू होणार नाहीत
काही राज्यांमध्ये 15 ऑक्टोबरपासून चित्रपट गृहे 50 टक्के क्षमतेने सुरू होत आहेत. राज्य सरकारने अजूनही याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सातारा जिल्हय़ातही 15 पासून चित्रपटगृहे सुरू होणार नाहीत. त्यासाठी आणखी अवधी लागणार आहे. मात्र बंद असलेले आठवडी बाजार, बागा, उद्याने सुरू होणार आहेत.
51 पैकी 31 रूग्णालयांत रूग्ण दोन आकडी तर 18 मध्ये एकेरी रूग्ण
जिल्हय़ात ऑक्टोबरच्या प्रारंभापासून रूग्णसंख्येचा वेग मंदावत चालला आहे. रोज बाधितांच्या आकडय़ांपेक्षा मुक्त होणारांचे प्रमाण जास्त आहे. रिकव्हरी रेटही 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. लोकांनी होम आयसोलेशनला पसंती दिली आहे. त्यामुळे कोरोना केअर सेंटर मोकळी झाली आहेत. जिल्हय़ात शासनाने अधिग्रहित केलेल्या 51 रूग्णालयांत शासकीय योजनेंतर्गंत कोविड रूग्णांवर उपचार होत होते. गुरूवारच्या आकडेवारीनुसार यातील 31 रूग्णालयांमध्ये रूग्णसंख्या केवळ दोन आकडी राहिली आहे. यातील 4 रूग्णालयांमध्ये रूग्णसंख्या 0 आहे. तर 14 रूग्णालयांत एकेरी आकडय़ांत रूग्णसंख्या आहे. सिव्हील सातारा येथे 104 तर कृष्णा रूग्णालय कराड येथे 266 रूग्ण उपचारात आहेत. हजारो बेड शिल्लक आहेत.
276 नागरिकांना डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 276 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून एकुण कोरोनामुक्ती 34 हजार 774 इतकी झाली आहे.
9 बाधितांचा मृत्यू
बुधवारी 9 बाधितांचा मृत्यू झाला. यात क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या शाहुपरी येथील 74 वर्षीय महिला, वडूज येथील 76 वर्षीय महिला, वर्ये (ता. सातारा) येथील 70 वर्षीय पुरुष, खेड नांदगिरी (ता. कोरेगाव) येथील 75 वर्षीय पुरुष, जिल्हय़ातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये झिरपवाडी (ता. फलटण) येथील 82 वर्षीय पुरुष, करवडी (ता. कराड) येथील 63 वर्षीय महिला. तर रात्री उशिरा कळवलेले राजपुरा (ता. सातारा) 67 वर्षीय पुरुष, बेलवडे (ता. कराड) येथील 67 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 45 वर्षीय महिला अशा एकुण 9 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
379 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 75, कराड येथील 16, फलटण येथील 8, कोरेगाव येथील 60, वाई येथील 29, खंडाळा येथील 12, रायगाव येथील 30, पानमळेवाडी येथील 51, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील 6, खावली येथील 21 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 56 असे एकूण 379 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
गुरूवारी जिल्हय़ात
एकुण बाधित 271
एकुण मुक्त 276
एकुण बळी 09
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
घेतलेले एकुण नमुने 167340
एकुण बाधित — 42969
घरी सोडलेले — 34774
मृत्यू — 1408
उपचारार्थ रुग्ण — 6787