सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने वेगात सुरू आहे. जिल्ह्याने सर्व प्रकारच्या लसीकरणाचा दोन्ही डोस मिळून 5 लाखांचा महत्त्वाचा टप्पा पार केला असून सर्व नागरिकांनी आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे. असाच प्रतिसाद यापुढे द्यावा आणि लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी यांनी संयुक्तपणे केले आहे.
आजपर्यंत 29 हजार 139 आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी प्रथम आणि दुसरा डोस मिळून 46 हजार 693 डोस घेतले गेले आहेत. फ्रन्टलाइन वर्कर म्हणजेच आघाडीच्या कर्मचाऱ्यांची 34 हजार 513 इतकी नोंदणी असून दोन्ही डोस मिळून 52 हजार 167 डोस देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अलीकडेच सुरू झालेल्या 45 वयापुढील मोहिमेअंतर्गत 45 ते 60 वयोगटातील 5 लाख 25 हजार 953 जणांनी नोंदणी केली असून त्यापैकी एक लाख 84 हजार 994 पहिला आणि दुसरा डोस मिळून एकूण डोस दिले गेले आहेत.
साठ वर्षे वयापुढील चार लाख 1 हजार 884 इतकी नोंदणी झाली असून पहिला आणि दुसरा डोस मिळून दोन लाख 21 हजार 93 डोस दिले गेले आहेत. या सर्व चारही प्रकारात मिळून नऊ लाख 91 हजार 489 इतकी नोंदणी झाली आहे. तसेच पहिला आणि दुसरा डोस मिळून 5 लाख 4 हजार 947 इतक्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे.