आतापर्यंत १ लाख २२ हजार नागरिकांची तपासणी, गावागावात उभी राहतेय ऑक्सिजन चळवळ
शनिवारी ९५५ जण कोरोनामुक्त तर ८०३ बाधित, सोमवारचा मूक मोर्चा स्थगित
प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यात २३ मार्चला कोरोनाने प्रवेश केला आणि त्याचा संसर्ग वेगाने वाढून जिल्ह्यातील बहुतांश गावात कोरोनाने आपले पाय रोवले आहेत. दररोज 800 ते 900 जण कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येतात. दररोज सुमारे 750 जणांचे स्वाब तपासले जात असून आतापर्यंत 1 लाख 22 हजार 917 जणांचे स्वाब तपासले असून जिल्ह्यात बाधितांचा आकडा 35 हजारावर गेला आहे. शनिवारी 955 जणांना डिस्चार्ज दिला आहे. रात्री उशिरा आलेल्या अहवालात 803 बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान, काल रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांच्यासमवेत कोव्हिडं डिफेंडर ग्रुपची बैठक झाली. त्यात सकारात्मक चर्चा झाल्याने सोमवारी होणारा मूक मोर्चा स्थगित करण्यात आला.
संसर्ग थांबेना; भीतीही आहे
कोरोना मार्च महिन्यापासून जिल्ह्यात मुक्कामाला आला आहे. सुरुवातीला परदेशातून आलेले बाधित सापडले. त्यातील एकाचा बळी ही घेतला. आता मात्र दररोज 25 ते 30 जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. उपचारासाठी घरातच ट्रीटमेंट बहुतांशीजण घेताना दिसत आहेत. कोरोनामुळे तुच्छतेची वागणूक मात्र बळावताना दिसत आहे. कोरोना बाधितांसाठी ऑक्सिजन चळवळ गावागावात उभी राहत आहे. मात्र, काही ठिकाणी नुसताच दिखावा केला जात आहे. मात्र, कोरोनामुळे कायदा दाखवून विरोधात बोलणाऱ्याचे तोंड बंद केले जाते. संसर्ग साखळी काही केल्या तुटत नाही. भीती प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे. गावागावात आता ग्रामदक्षता कमिटी कोरोनाच्या अनुषंगाने नेमके आपल्या गावात काय करता येईल हे पहात आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 35 लाख एवढी आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 22 हजार 917 जणांचे खाजगी आणि सरकारी यंत्रणेकडून स्वब तपासणी करण्यात आली आहे. बाधितांचा आकडा 35 हजारापर्यंत पोहचला आहे. 25 हजार 1 एवढे कोरोनामुक्त झाले आहेत.1 हजार 60 जणांचा मृत्यू झाला आहे.
955 नागरिकांना दिला डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 955 नागरिकांना घरी सोडण्यात आले. कोरोना मुक्तांच्या संख्येने 25 हजाराचा टप्पा पार केला आहे.
782 जणांचे नमुने तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 32, कराड 23, उपजिल्हा रुग्णालय फलटण 101, कोरेगाव 63, वाई 110, खंडाळा 68, रायगांव 80, पानमळेवाडी 67, मायणी 16, महाबळेश्वर 27, पाटण 27, दहिवडी 28, खावली 12, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 128 असे एकूण 782 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
28 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असललेल्या लिंब (ता. सातारा) येथील 54 वर्षीय पुरुष, करंडी (ता. जावळी) येथील 50 वर्षीय महिला, पेठ किन्हई (ता. कोरेगाव) येथील 65 महिला, कुडाळ (ता. जावळी) येथील 60 वर्षीय पुरुष, चिंचणेर निम (ता. सातारा) येथील 65 वर्षीय पुरुष, जिहे (ता सातारा) येथील 48 वर्षीय महिला, शेंद्रे (ता. सातारा) येथील 54 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये गोरेगाव (ता. खटाव) येथील 81 वर्षीय पुरुष, घोडेवाडी (ता. माण) येथील 76 वर्षीय पुरुष, मसूर (ता. कराड) येथील 85 वर्षीय पुरुष, कोयना (ता. कराड) येथील 17 वर्षीय महिला, आगाशिवनगर (ता. कराड) येथील 60 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली (ता. कराड) येथील 80 वर्षीय महिला, शनिवार पेठ (सातारा) येथील 74 वर्षीय महिला तसेच उशिरा कळविलेल्या कार्वे नाका कराड येथील 65 वर्षीय पुरुष, ओगलेवाडी (ता. कराड) येथील 25 वर्षीय महिला, रुक्मिणीनगर कराड येथील 58 वर्षीय पुरुष, विंग (ता. कराड) येथील 68 वर्षीय पुरुष, मालगाव (ता. सातारा) येथील 85 वर्षीय पुरुष, विद्यानगर कराड येथील 69 वर्षीय पुरुष, जाखणवाडी (ता. कराड) येथील 71 वर्षीय पुरुष, हणबरवाडी (ता. कराड) येथील 70 वर्षीय महिला, शहापूर (ता. कराड) येथील 65 वर्षीय महिला, मलकापूर (ता. कराड) येथील 80 वर्षीय पुरुष, उंचीठाणे (ता. खटाव) येथील 80 वर्षीय पुरुष, उंब्रज (ता. कराड) येथील 71 वर्षीय महिला, कराड 61 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर (ता. कराड) 47 वर्षीय पुरुष, असे एकूण 28 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
चर्चेनंतर मूक मोर्चा स्थगित
जिल्हाधिकारी यांच्याशी कोव्हिड डिफेनडर ग्रुपच्या सदस्यांची बैठक झाली. त्यात सकारात्मक चर्चा झाल्याने मूक मोर्चा स्थगित केल्याचे नगरसेवक अमोल मोहिते यांनी जाहीर केले. या बैठकीतले मुद्दे प्लाझ्मा चा तुटवडा भासू नये म्हणून सिव्हिल बरोबरच आणखी चार ठिकाणी प्लाझ्मा बॅंक्सना परवानगी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पेशंटच्या केस पेपरवरती यापुढे ब्लड ग्रुपचा उल्लेख बंधनकारक असेल. जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी किती बेड उपलब्ध आहेत हे येत्या दोन दिवसात डॅशबोर्डद्वारे प्रसिद्ध करणार. जम्बो हॉस्पिटल कोणत्याही परिस्थिती ऑक्टोम्बर च्या पहिल्या आठवड्यात चालू करणार. . तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथील दोन्ही हॉलमध्ये पूर्वतयारी सुरु. जे रुग्ण शासकीय ठिकाणी ऍडमिट आहेत त्यांच्यासाठी दहा हजार रेमडेसीवीर इंजेक्शनची ऑर्डर दिली असून येत्या आठवड्यात ती उपलब्ध होतील. खाजगी रुग्णालयांना त्यांची डिमांडची विचारणा करण्यात येणार असून त्यांना सुद्धा इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यात येतील. गर्भवती महिलांसाठी त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाईल तसेच त्यासाठी एक मेकॅनिझम ठरवून विशेष आदेश काढले जातील. याबरोबरच खाजगी रुग्णालयाकडून इंजेक्शन ची थकबाकी वसूल करतानाच यापूढे प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर महात्मा फुले योजनेचा बोर्ड, सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यामध्येच पेशंट्स अँडमिट करून घेणे, जादा बिलाची आकारणी करणाऱ्या रुग्णलयांवरती कडक बंधने घातली जातील असेही कबुल केल्याने आंदोलन स्थगित केल्याचे सांगितले.
शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे व त्यांच्या आईंची कोरोनावर मात
समाजासाठी कोरोनाच्या काळात अविरतपणे झटणारे शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या आईला ही कोरोनाची बाधा झाली होती. दोन्ही मायलकांनी कोरोनाला हरवून आल्याने त्यांचे स्वागत पेठेत नागरिकांनी केले आहे. सध्या दोघेही सोमवार पेठेतल्या घरी आराम घेत आहेत. त्यांनी दिलेल्या लढ्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
जिल्ह्यात शनिवारी
बाधित 803
मुक्त 955
मृत्यू 28
जिल्ह्यात शनिवारपर्यंत
घेतलेले एकूण नमुने — 122917
एकूण बाधित — 35412
घरी सोडण्यात आलेले — 25001
मृत्यू — 1060
उपचारार्थ रुग्ण — 9351