प्रतिनिधी
सातारा
सध्या जगभरात व भारतात मोठय़ा प्रमाणावर कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचप्रमाणे इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळून येत आहेत. कोरोना व्हायरसचे आतापर्यंत सातारा जिह्यातही सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यावरील उपाययोजना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात सुरुवात झालेली आहे. त्या अनुषगांने जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या सुचनेनुसार सातारा जिह्यात कोरोना केअर सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. या कोरोना सेंटरमध्ये संशयीत कोरोना रुग्णाची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिली.
कोरोनाचे रुग्ण जिह्यात आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना व काळजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार घेतली जात आहे. सध्या जिह्यातील सर्व गावामध्यील रुग्णांची माहिती घेण्यात येत आहे. या रुग्णामध्ये आय एलआय (सर्दी, ताप, खोकला सदृष्य लक्षणे) व सारी (तीव्र सर्दी, ताप, खोकला असणारे रुग्ण ज्यांना दवाखान्यात दाखल करण्याची आवश्यकता आहे) या बाबतच्या रुग्णांची माहिती घेण्यात येत आहे. यामधील ज्या रुग्णामध्ये सदर लक्षणे आढळून येत आहेत, त्यांची कोरोनाची तपासणी करण्यासाठी सातारा जिह्यात कोरोना केअर सेंटर स्थापना करण्यात आली आहे. त्या ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. याकरीता सामान्य रुग्णालय सातारा (सातारा व जावली), उपजिल्हा रुग्णालय कराड (कराड व पाटण), ग्रामीण रुग्णालय वाई (वाई, खंडाळा व महाबळेश्वर), ग्रामीण रुग्णाल कोरेगांव (कोरेगाव व खटाव) व उप जिल्हा रुग्णालय फलटण (फलटण, माण) येथे कोरोना केअर सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी संबंधीत रुग्णांचे घाशाच्या स्त्रवाचे नमुने घेण्यात येणार आहेत. तसेच जिह्यात स्थापन करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र व हेल्थ वेलनेस सेंटर या ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टरांना रुग्णांना तपासणीवेळी वापरा करीता फेस शिल्ड, पीपीई किट, एन 95 मास्क, ट्रीपल लेअर मास्क व सॅनिटाईझर आदींचा पुरवठा करण्यात आला आहे, असे डॉ सचिन पाटील यांनी सांगितले.
जिह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोरोना आजाराचे गांभीर्य ओळखून होम कोरनटाईनमध्ये रहावे. सर्दी, ताप, खोकला झाल्यास त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. जरुरी असल्यास तपासणी करून घ्यावी, जेणे करून त्वरित उपचार करता येतील, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी सांगितले.
जिह्यातील सर्व आरोग्य संस्थांना रुग्ण तपासणी करता डॉक्टराना फेस शिल्ड, पीपीइ किट, एन 95 मास्क, ट्रिपल लियर मास्क, सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात दिले आहेत. या साहित्यांची कमतरता होणार नाही याची दक्षता जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जात आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.