औंध महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन साजरा
प्रतिनिधी / औंध
ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली आहे त्याला संसर्गाचा प्रादुर्भाव होत नाही. महामारीने लोकांना आरोग्याचे महत्त्व कळाले आहे. उत्तम आरोग्यासाठी नियमित क्रीडांगणावर व्यायाम करा खेळाचा आनंद घ्या. कारण जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे कोरोनाने सिध्द झाले आहे. असे प्रतिपादन औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे यांनी केले.
औंध येथील राजा श्रीपतराव महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी क्रीडासंचालक प्रा सुधाकर कुमकर, हणमंतराव खैरमोडे, राजेखान शिकलगार, सुनील हत्तीगोटे, आनंदा रणदिवे, मोहन माकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिंदे म्हणाले की हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी क्रीडा क्षेत्रात हॉकीमध्ये दिलेले योगदान विसरता येणार नाही. देशातील सर्व खेळांडूंचे ते प्रेरणास्थान होते. म्हणून त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा केला जातो. महाविद्यालयात देखील अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांत खेळाची गोडी निर्माण करावी असे आवाहन शिंदे यांनी केले.
यावेळी शिंदे यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोशल डिस्टनसिंगचे पालन करून राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात आला. प्रा सुधाकर कुमकर प्रास्ताविक केले. हणमंत खैरमोडे यांनी आभार मानले.