वार्ताहर / कास :
जावली तालुक्यातील बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी भर रात्री स्वतःचा जीव धोक्यात घालून शिवसागर जलाशयात बोटीने पोहचून महिलेची यशस्वी प्रसूती केली. डॉ. मोरेंचा रविवारी सुट्टीच्या दिवस असूनही तसेच शिवसागर जलाशयावर वादळी वारे वाहत असताना जिद्दीने त्यांनी हे धाडसी कार्य केले. या धाडसी व प्रामाणिक सेवेबद्दल अनेकांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
बामणोली व तापोळा हा परिसर निसर्गसंपदेने नटलेला नयनरम्य असा परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे कडेकपाऱ्यात वसलेली आहेत. अनेक गावे व वाड्यावस्त्यापर्यंत पोहचण्यासाठी आजही साध्या आणि कच्च्या रस्त्याचीही सोय नाही. दुसरीकडे शिवसागर जलाशयापलीकडे असणाऱ्या कांदाटी, सोळशी व कोयना अशा तीन खोऱ्यातील लोकांचे दळणवळण तर पूर्णपणे पाण्यातूनच होत आहे. वादळी वारे, अतिवृष्टी अशा वेळी तर येथील जीवनचक्र पूर्णपणे ठप्प होते. गरोदर स्त्रिया व वृध्द आजारी पेशंट यांना आजही डोलीतूनच पक्क्या रस्त्यापर्यंत पोहचवावे लागते. रविवारी असीच एक थरारक घटना शिवसागर जलाशयाच्या कांदाटी खोऱ्यात घडली.
रविवारी दिवस-रात्र बामणोली तापोळा परिसरात वादळी वारे वाहत होते. त्यामुळे पाण्यातून लाँच चालविणे कठीण होते. पिंपरी तांब या गावच्या एकता जाधव या महिलेला प्रसूति वेदना सुरू झाल्या रात्रीच्या एक वाजता गावकरी लॉंचेतून तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सदर महिलेला नेऊ लागले. कारण सदर महिलेचे गाव तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. परंतू बामणोली च्या जवळ आल्यावर लाँच वाऱ्यामुळे चालविता येत नव्हती. तेव्हा काही ग्रामस्थांनी बामणोलीच्या डॉक्टर मोरेंना फोन केला. त्यांनी झोपेतून उठून व सोबत पवार व पाडवी या नर्सना घेऊन रात्री दीड वाजता दोन कि.मी .पायी चालत नदीकिनारी पोहचले. परंतू, रुग्णाची लाँच वाऱ्यामुळे किनाऱ्यावर पोहचत नसल्यामुळे मोरे डॉक्टरांनी बामणोली बोट क्लबची एक लाँच घेऊन त्या लाँचेपर्यंत पोहचून पाण्यातच त्या महिलेची यशस्वीपणे प्रसूती केली.
आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्ण नसतानाही शिवाय वादळी वारे व पाण्यातून रात्रीचा प्रवास करून स्वतःचा जीव धोक्यात घालून या आदर्श प्रामाणिक डॉक्टरांनी या महिलेचा जीव वाचवून यशस्वी प्रसूति केली. याबद्दल मोरे डॉक्टरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.