प्रतिनिधी / सातारा
शाळा म्हणजे ज्ञान मंदिर. शाळा म्हणजे पिढी घडवणारे केंद्र. मात्र, याच शाळेचा काही लोकांनी वेगळा अर्थ घेत असून कुठे प्रेमाची शाळा वेब सिरीजच्या माध्यमातून दाखवल्याचे अलीकडे प्रकार दिसू लागले आहेत. पाटण तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या मोगरवाडीची शाळा डोंगर पठारावर आहे. या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी अतिशय बिकट परिस्थितीत शिक्षण घेतात. त्यांना सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षण गरजेचे आहे. हीच गरज ओळखून शाळेचे शिक्षक दीपक मगर यांनी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने सर्व शाळाच टॅबयुक्त केली आहे. त्यांचे तालुक्यासह जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
बदल हा काळानुसार होत असतो आणि शिक्षणच बदल करु शकते. पाटण तालुक्यातील तारळे भागातली मोगरवाडीची शाळा. या शाळेवर नोकरी करायला शिक्षकांची ना असते. कारण ही तसेच वाडीला रस्ता नव्हता. शाळेला इमारत नव्हती. पण चांगले शिक्षक असल्यास शाळेच आणि गावच नंदनवन करतात. त्याचाच प्रत्यय दीपक मगर यांच्या रूपाने आला. समाजमंदिरात भरत असलेली शाळा ग्रामस्थांच्या व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने इमारत उभी केली. बाहेरच्या जगात आहे ते आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांची धडपड सुरू असते. एवढंच नाहीतर त्यांनी मोगरवाडीत मिश्रीमुक्त गाव हे ही अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणाची गरज निर्माण झाली. मात्र आपली ही मुले कुठे मागे राहू नयेत त्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे या उद्देशाने आणि ध्येयाने झपाटून कामाला लागले अन बघता बघता त्यांना मिळाले आणि शाळा टॅबयुक्त शाळा झाली आहे.
स्वातंत्र्यदिनी दुर्गम मोगरवाडी (कोंजवडे) ता. पाटण जि. सातारा येथील जि. प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टॅब भेट मिळाले. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाची बिकट वाट सुखकर झाली आणि विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने खुलून गेले. मोगरवाडीची शाळा इमारत बांधण्यासाठी तब्बल 3 लाखांची भरघोस मदत देणारे बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईचे सहाय्यक अभियंता, तारळे येथील अक्षयपात्र चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुहास नेमाणे यांनी विद्यार्थ्यांना 2 टॅब भेट दिले तर सातारा येथील प्रथितयश सामाजिक कार्यकर्ते आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमूहाचे अध्यक्ष फिरोज पठाण यांनी संवेदनशीलता जपत 2 टॅब भेट दिले. याचसोबत विशेष आणि अभिमानास्पद बाब म्हणजे भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले जाखणगाव, ता खटावचे जवान उमेश शिंदे व त्यांचा मित्रपरिवार विलास भगत (रामनगर, बुलढाणा), निखिल शेलार(खेड,सातारा), शशिकांत वाघमोडे, विजय जगदाळे, दीपक खोत, तुषार यादव(दुर्गळवाडी, ता.कोरेगाव), स्वप्निल मोरे(कल्याण, मुंबई), विजय गोडसे (काटकरवाडी, सातारा), विजय कदम(दिघी, पुणे), उमेश साळुंखे (सातारा), दीपक कोकरे (पिलाणी, सातारा), प्रविण कदम(सांगली), रितेश मोरे(महाड, रायगड), प्रशांत महाजन(शिरूर, अहमदनगर), निखिल जगदाळे (उंब्रज, ता कराड), निलेश बाबर(सोनगाव), सुदर्शन पाटील(बेलवळे खु।। कोल्हापूर), नवनाथ करुंजले(पाडळी, रांजणगाव, अ.नगर), संदीप कदम (फलटण), विशाल माने (म्हसवड) यांनी देशसेवेसोबत सामाजिक भान व संवेदनशीलता जपत तब्बल 3 टॅब येथील विद्यार्थ्यांसाठी भेट दिले.
एकाचवेळी 7 टॅब मोगरवाडीच्या शालेय विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. तर यापूर्वी याच शाळेतून बदलून गेलेल्या शरद दिवेकर यांनी या शाळेस भेट दिलेला 1 टॅब दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी लोरेवाडी ता. पाटण येथील भारतीय सैन्यदलातील जवान किरण लोरे यांनी मोगरवाडी शाळेत येऊन टॅबसाठी देऊ केलेली मदत आणि तारळे ता. पाटण येथील प्रियांका राजेंद्र वाकडे हिने तिच्या पहिल्या कमाईतील दिलेली भरीव मदत यातून 1 टॅब शाळेसाठी घेण्यात आला होता. एकूण 9 टॅबची उपलब्धता झाल्याने मोगरवाडीतील प्रत्येक विद्यार्थ्यांस टॅब मिळाला. आणि ही शाळा खऱ्या अर्थाने टॅबयुक्त शाळा झाली.
यापुढे जात सातारा येथील स्टार एज्युस्मार्ट इलर्निंग चे राहुल तारळेकर यांनी सर्व टॅबमध्ये इयत्तनिहाय अभ्यासक्रम इन्स्टॉल करून देत अत्यंत महत्वाची मदत व भूमिका बजावली आहे त्यामुळे दर्जेदार ऑफलाईन शिक्षणाची सुविधा सर्व मुलांना उपलब्ध झाली. सध्या कोरोना संकट प्रसंगी दुर्गम भागातील या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळणे दुरापास्त झाले होते मात्र वरील सर्व संवेदनशील आणि दानशूर व्यक्तिंमुळे या विद्यार्थ्यांना आज स्वातंत्रदिनी खऱ्याअर्थाने लाखमोलाची मदत मिळाली आणि सर्वच विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने खुलून गेले.ही मदत मिळवताना विजय पवार यांनी ही प्रयत्न केले.शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्या हस्ते दि.12रोजी उदघाटन तर स्वातंत्र दिनी केंद्र प्रमुख निकम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले.
जावली तालुक्यातील एका शाळेतल्या शिक्षकाच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना संगणक
जावली तालुक्यातील डोंगर भागात अजून ही मोबाईलची रेंज नाही. तेथे ऑनलाईन शिक्षण कसे मिळणार हा संशोधनाचा विषय असला तरी इच्छा असेल तर मार्ग दिसेल याप्रमाणे या तालुक्यात एका शाळेवर पाटण तालुक्यातील एक शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. त्यांनी सध्याचे शिक्षण सह उपसंचालक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या घरीच संगणक दिले आहेत.बदलता अभ्यासक्रम पेन ड्राइव्हमधून नेऊन तो विद्यार्थ्यांना संगणकावर सुरू करून शिक्षण दिले जात आहे. मात्र याची कुठे ही वाच्यता आणि प्रसिध्दी नाही. शैक्षणिक कार्य हाच मूलमंत्र घेऊन ते शिक्षक काम करत आहेत.