गावागावात दोन्ही राजेंचे सवते सुभे
विशाल कदम/ सातारा
सातारा तालुक्यातील 130 गावांची सध्या निवडणूक सुरु आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील काही गावे ही कोरेगाव विधानसभा मतदार संघात तर काही गावे ही कराड उत्तर मतदार संघात आहेत. उरलेल्या गावांमध्ये थोरले आणि धाकटे राजेंचे गटतट गावागावात आहेत. दोन्ही राजे जरी एका पक्षात असले तरीही गावागावात दोन्ही राजेंना मानणारे गटातटाच्या पॅनेलमध्येच निवडणूका होत आहेत. तेथे महाविकास आघाडीच्या कोणत्या पक्षाला थारा नाही. मात्र, कराड उत्तरमध्ये जी गावे सातारा तालुक्यातील आहेत, तेथे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचा प्रभाव जाणवतो. कोरेगाव विधानसभा मतदार संघात दोन्ही आमदार शिंदेना मानणाऱया गटातटातच चुरस आहे.
सातारा तालुक्याचे तीन ठिकाणी विभाजन झाल्याने तीन बोळ अन् सगळा ख्योळ अशी नवीन म्हण तयार होवू लागली आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यात विशेष करुन गवडीपासून ते लिंबपर्यंत, परळी, शेंद्रे भागातल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये गावागावात थोरल्या राजांचे आणि धाकटय़ा राजांचे गट पहायला मिळतात. थोरले राजे उदयनराजे आणि धाकटे राजे शिवेंद्रराजे हे दोघेही भाजपामध्ये आहेत. तरीही गावागावातले कार्यक्रर्ते हे आपल्याच राजांची सत्ता ग्रामपंचायतीवर आली पाहिजे यासाठी आरोपप्रत्यारोप करत आहेत. राजकीय खेळय़ा करत आहेत. त्यामध्ये परळी भागातल्या डोंगरी भागातल्या गावागावात दोन्ही राजेंचे गटातच पॅनेलमध्ये रंगत आहे. गवडीपासून ते सभापतींच्या कळंबे गावामध्येही निवडणूकीकरिता दोन्ही गट आमनेसामने आहेत. आपल्याच गटाचे जास्त सदस्य निवडून आले तर आपलाच सरपंच होईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे सातारा तालुक्यातील सातारा विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये महाविकास आघाडीचे पॅनेल कोठेही दिसत नाही.
कोरेगाव विधानसभा मतदार संघात दोन्ही शिंदे आमदारांच्या विचारांचे पॅनेल
सातारा तालुक्यातील काही गावांचा समावेश हा कोरेगाव विधानसभा मतदार संघात येतो. तेथे ही गावपातळीवर महाविकास आघाडी म्हणून लढली जात नाही तर तेथे काही ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे यांच्या विचाराचे पॅनेल विरुद्ध आमदार महेश शिंदे यांच्या विचाराचे पॅनेल असेच चित्र आहे. तर काही ठिकाणी खासदार उदयनराजे यांना मानणारा गट व आमदार महेश शिंदे यांचा गट विरुद्ध आमदार शिवेंद्रराजे यांना मानणारा गट व आमदार शशिकांत शिंदे यांना मानणारा गट असे चित्र आहे. एवढेच काय शिवसेनेच्या एका नेत्याच्या गावातल्या निवडणूकीत स्वतःचे शिवसेनेचे असे काही अस्तित्व दिसत नाही. काही छोटय़ाशा लोकसंख्येच्या वाडीवर प्रयत्न केला आहे परंतु तेथेही ग्रामपंचायत सदस्यही निवडून येणार नाही, अशी चर्चा सुरु आहे.
कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य
सातारा तालुक्यातील काही गावे विशेष करुन नागठाणे, अतित, फत्यापुर या आदी गावांमध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विचारांचे प्राबल्य अलिकडच्या काही वर्षात वाढले आहे. इतर पक्ष निवडणूकीपूर्वी उगवतात अन् पुन्हा गायब होतात. त्यामुळे राष्ट्रवादीला मानणाऱया ग्रामपंचायतींमध्ये पॅनेल असून विरोधात गावागावात परिवर्तन पॅनेल म्हणून पडले आहेत.