ढेबेवाडी / प्रतिनिधी :
तुपेवाडी (काढणे) ता. पाटण येथील एकाच कुटुंबातील तब्बल ११ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये पाच पुरुष, चार महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोंजारी व मंगेश खबाले यांनी ही माहिती दिली. एकाच वेळी एकाच गावात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली असून, या गावात तळ ठोकत सर्वेक्षण हाती घेतले आहे.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील आठ दिवसापूर्वी तुपेवाडी मधील ७० वर्षीय पुरुष व्यक्तीला त्रास होत असल्याने ते कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले. त्यांची कोरोना टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील हाय रिस्क कॉन्टॅक्ट असलेल्या १८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यांचा अहवाल रविवारी रात्री उशिरा येथील आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यात 11 जणांना करोनाचा संसर्ग झाला असल्याची बाब उघड झाली. हे सर्वजण एकाच गावातील आहेत.
ग्रामपंचायत प्रशासनाने परिसराचे निर्जंतुकीकरून करून योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यावेळी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.संतोष पवार ,तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी व मंगेश खबाले, आरोग्य सहाय्यक .पावरा आरोग्य सेवक रोहित भोकरे, ग्रामसेवक बी.एस.पवार आदी उपस्थित होते. बाधित असलेले सर्व जण होमआयसोलोशन मध्ये आहेत. त्याच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेऊन आहे.