आनेवाड़ी / धनंजय गोरे
सध्या जगात प्रामाणिकपणा असल्याने दिलासा मिळत आहे. याची प्रचिती सायगाव येथे पाहण्यास मिळत आहे. सव्वा चार लाखाचे सोने रस्त्यावर पडले होते. हे सोने उचलून मेढा पोलिस ठाण्यात जमा करून पोलीस पाटील सुहास भोसले यांनी एका आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत माहिती अशी की, सायगाव ता जावळी येथे दैनंदिन काम करून खर्शी तर्फ कुडाळ ता जावळीचे पोलीस पाटील सुहास भोसले हे आपल्या दुचाकी वाहनातून रविवारी रात्री घरी निघाले होते. रस्त्यावर मोटारसायकल हेडलाईटच्या प्रकाशात त्यांना सोनेरी वस्तू पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ती वस्तू उचलून थेट मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि निळकंठ राठोड यांना त्वरित याबाबत मोबाईलवर सांगितले. रात्रीची वेळ असल्याने सकाळी सापडलेली सोनेरी वस्तू घेऊन या अशी सूचना केली. त्यानुसार पोलीस पाटील सुहास भोसले यांनी सकाळी मेढा पोलीस ठाणे गाठले. मेढा बाजारातील एका सोनाराकडे ती वस्तू पोलिसांना सोबत घेऊन दाखविली.
त्यावेळी ते सोन्याचेच दागिने असल्याची खात्री पटल्यानंतर त्याचे वजन केले असता त्याचे वजन आठ तोळे तीन ग्रॅम पाचशे मिली एवढे भरले. सदर दागिने सपोनि राठोड यांच्याकडे सोपविण्यात आले. सोन्याची खात्री पटवून ते मालकाला देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. दरम्यान, सायगाव येथील एका महिलेचे दागिने पडल्याची चर्चा होऊ लागली आहे. मेढा पोलिसांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर दागिने देण्याची ठरविल्याने दागिने मालकाचा जीव भांड्यात पडला आहे. यापूर्वी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पोलीस पाटील भोसले यांनी अनेक विधायक उपक्रमात सहभागी होऊन कर्तव्य जपलं आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.