‘तरुण भारत’च्या वृत्ताने पाटण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा झाली खडबडून जागी
‘तरुण भारत’चे कुटूंबियांनी मानले आभारतारळेतील पुढारी लगेच मदतीला सरसावले
प्रतिनिधी / सातारा
पाटण तालुक्यातील तारळे येथील वरच्या पेठेत 85 वर्षीय वृद्ध महिला कोरोनाबाधित आढळून आली होती. तिला धाप मोठ्या प्रमाणावर लागली होती. कुटूंबाकडून त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळतो की नाही यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, पाटण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा वय ऐकून घरातच उपचार करा, असा सल्ला देत अनास्था दाखवत होते. ही कैफियत तरुण भारतने मांडताच पाटण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा खडबडुन जागे झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात रविवारी बेड मिळाला आहे. त्याबद्दल कुटूंबियांनी ‘तरुण भारत’चे आभार मानले.
पाटण तालुक्यात कोरोनाचे रुग्ण गावागावात आहेत. तारळे येथे ही आहेत. मात्र, या रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार ‘तरुण भारत’ने उघडकीस आणला. तारळे येथील वरच्या पेठेतल्या 85 वर्षीय वृद्धेला कोरोनाची बाधा झाली. तीन दिवस घरातच.आरोग्य विभाग फिरकत नव्हता. रुग्णाला धाप मोठ्या प्रमाणावर लागली होती. उपचारासाठी बेड मिळावा यासाठी कुटूंबीय प्रयत्न करत होते. परंतु वय सांगून घरीच उपचार करा, असा सल्ला दिला जात होता. याबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले. तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैधकीय अधिकारी व तारळे येथील पुढारी यांनी त्या रुग्णाची चौकशी केली. त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ लाहोटी, सदाभाऊ जाधव, शिवदौलत बँकेचे संचालक अभिजित पाटील, उपसरपंच देशमुख यांचा समावेश होता. रविवारी सायंकाळी त्या रुग्णास जिल्हा रुग्णालयात बेड मिळाला. ऑक्सिजनसह बेड मिळाला असून उपचार सुरू झाले आहेत.
‘तरुण भारत‘चे मानले आभार
सकाळीच फोन खणाणला. साहेब तुम्ही तरुण भारतमध्ये वस्तुस्थिती दिल्याने बेड मिळाला. आता रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. ‘तरुण भारत’चे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, अशा शब्दात त्यांनी आभार मानले.