प्रतिनिधी/सातारा
काल दुपारी डॉक्टरच्या वेशात रविवार पेठेत दरोडेखोरांना नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले. यातील चौघांना सातारा शहर पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 2सष्टेंबरपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या टोळीतील फरार झालेल्या एकाचा सातारा पोलीस शोध घेत असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, सर्व दरोडेखोर हे पुणे येथील आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार पेठेत दुपारी बिलम्पली यांच्या घरात डॉक्टरच्या वेशात कोरोना सर्व्हे करायला आलो आहे असे सांगत पाच जणानी अचानक मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबवली. हा प्रकार लगेच तेथील युवकांनी पाहताच त्याना पकडले. तर एकाने पळ काढला.
त्यामध्ये पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये महेंद्र नामदास मारणे, युवराज शिंदे, सोमनाथ सातव आणि रोहिणी टेंमगिरे (सर्व रा.हडपसर पुणे) अशी असून त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम तपास करत आहेत.