पिरेवाडीच्या युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची दिली होती धमकी
वन अधिकारी गावित, कर्मचारी सोनवलेसह अज्ञात दोघांचा समावेश
प्रतिनिधी / नागठाणे
पिरेवाडी (भैरवगड) ता.सातारा येथील ओंकार शामराव शिंदे (वय.१९) या युवकास ‘शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून करिअर खराब करतो’ अशी धमकी देत २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी वनविभागाच्या दोन कर्मचार्यासह अज्ञात दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.वनविभागाचे सोनावले व गावित अशी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री उशिरा हा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पिरेवाडी (भैरवगड) ता. सातारा येथील ओंकार शिंदे हा युवक ‘माकडे त्याच्या शिवारातील पिकांची नासाडी करत आहेत’ अशी माहिती मिळाल्याने तो त्याच्या कुरण नावाच्या शिवारात हातात छोटी काठी घेऊन गेला होता. यावेळी तेथे वनविभागाचे कर्मचारी गावित, सोनावले व अज्ञात दोघांनी त्याला पकडले. यावेळी वनकर्मचारी गावित याने ओंकार शिंदे याला कारमध्ये बसवले. तर सोनवले व एक अज्ञात व्यक्ती तेथेच थांबले.कारमधून साताराकडे येत असताना गावित याने ‘तू मला एक लाख रुपये दे. आम्ही तुला सोडून देतो. नाहीतर तुझ्यावर प्राण्यांची शिकार करण्याचा गुन्हा दाखल करतो’ असे म्हणून घरातील लोकांना फोन लावण्यास सांगितले.
वडिलांचा फोन न लागल्याने ओंकारकडून चुलत भाऊ राजेंद्र शिंदे याचा नंबर घेऊन त्याला फोन केला.त्यालाही ‘ओंकार शिंदे याला शिकार करताना पकडले आहे. १ लाख रुपये घेऊन वडलांना पाठवून देनाहीतर ओंकारचे करिअर खराब होईल’ अशी धमकी दिली.या दरम्यान गावित याने ओंकारला साताऱ्यात फिरवून रात्री नर्सरीत डांबून ठेऊन त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली व त्याच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या.
रात्री उशिरा त्याला खिंडवाडी येथे महामार्गानजिक असलेक्या अप्रतिम लॉज येथे नेऊन पुन्हा डांबून ठेवले. रात्री उशिरा वडील शामराव शिंदे,अमोल गायकवाड,सोनावले व अज्ञात एक इसम हे खिंडवाडी अप्रतिम लॉजवर आले.तेथे वडिलांच्या व अमोल गायकवाडच्या सह्या घेत दुसऱ्या दिवशी तीस हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी जमा झालेले पैसे घेऊन गावातील काही लोकांसह वडील शामराव शिंदे यांनी त्यांना जमा झालेले २५ हजार रुपये दिले. असे ओंकार शिंदे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
बोरगाव पोलिसांनी याबाबत दोन्ही वनकर्मचार्यांसह अज्ञात दोघांवर खडणीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि डॉ. सागर वाघ करत आहेत. या घटनेचा तक्रार अर्ज पीडित ओंकार शिंदे याने सातारा वनविभाग तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांच्याकडे दिला होता.घटनेचे गांभीर्य ओळखून समीर शेख यांनी याबाबत तक्रार अर्ज बोरगाव पोलिसांकडे वर्ग करून सखोल तपासाचे आदेश दिले होते. बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ यांनी तात्काळ हालचाल करत या संपूर्ण प्रकरणाची स्वतः चौकशी सुरू केली होती. शनिवारी रात्री उशिरा त्यांनी वनकर्मचार्यांसह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला.