सातारा / प्रतिनिधी :
टेम्पोत चार बैल दाटीवाटीने घेऊन जात असल्याची बाब शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या धारकऱ्यांच्या निदर्शनास येताच सातारा तालुक्यातील नागेवाडी येथे तो टेम्पो अडवून तीन बैलांची सुटका केली. दुर्दैवाने यात एका बैलाचा मृत्यू झाला. मृत बैलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर तीन बैलांना गोशाळेत ठेवण्यात आले.
सातारा तालुक्यातील नागेवाडी येथे रोडवर उभा असलेल्या पिकअप टेम्पो क्रमांक एमएच 11-4613 मध्ये जनावरांची वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी टेम्पो थांबवला. नागेवाडी गावात पोलिसांच्या मदतीने तो टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोत 4 खिलार बैलांचे चारही पाय व तोंडे घट्ट दोरीने बांधलेले दिसत होते. त्यांना दाटीवाटीने कोंबून भरल्यामुळे त्यांना जखमा झालेल्या होत्या.
टेम्पो चालकाकडे पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने केंजळ येथून हे बैल भरुन कराड येथे कत्तलीसाठी पाठविणार असल्याचे सांगितले. त्यावरुन संबंधितांवर पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली. वेदांता गोशाळेचे शैलेंद्र सावंत यांनी पोलिसात फिर्याद दिली.