प्रतिनिधी / कराड
पाटण तालुक्यातील मोरगिरीजवळ धावडी या गावात विहिरीत ५ गवे पडल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. वन विभागाने रात्री युद्ध पातळीवर बचाव कार्य राबवून चार गव्यांना जीवदान दिले. तर त्यातील एका गव्याचा मृत्यू झाला.
धावडी गावातील बाळासाहेब सावंत यांच्या विहिरीत गवे पडले असल्याची माहिती शनिवारी सांयकाळी ७.३० वाजता वन विभागाला मिळाली. त्यानंतर वन विभागाची धावपळ उडाली. जागेवर वनक्षेत्रपाल काळे व इतर सर्व कर्मचारी बचाव कार्यासाठी त्वरित घटनास्थळी पोहचले. गवे विहिरीतून बाहेर काढण्यासाठी जे सी बी व क्रेनही मागवण्यात आली. विहीर एका बाजूने जेसीबीने फोडण्यात आली. त्यामुळे गवे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. ४ गवे बाहेर पडून पळून गेले. यात दोन माद्या व दोन पिल्ले होती. एक नर गवा पाण्यात बुडन मृत झाला आहे. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी ही माहिती दिली.