विरोधकांनी केला सत्ताधाऱ्यांवर आरोप, सत्ताधारी नगरसेवक चहा पानात व्यस्त
प्रतिनिधी / सातारा
सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. ही सभा कोरोनाचे कारण देत तहकूब करण्यात आली. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याचा आरोप केलेला आहे तर सत्ताधारी नगरसेवक चहा पानामध्ये व्यस्त असल्याचे दिसत होते.
नगराध्यक्षा माधुरी कदम यांनी सर्वसाधारण सभेला सकाळी अकरा वाजता त्यांच्या केबिन मधून ऑनलाइन सुरुवात केली. सभेत सहभागी होण्यासाठी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे त्यांच्या केबिनमधून सहभागी झाले होते. तसेच सुजाता राजेमहाडिक व बाळासाहेब ढेकणे हेही त्यांच्या केबिनमधून सभेत सहभागी झाले होते. राष्ट्रगीताने सभेला सुरुवात झाली मात्र काही वेळातच कोरोना लसीकरण कर्मचाऱ्यांनी घेतले नसल्याचे व शासनाच्या आदेशानुसार सभा तहकूब करण्यात येत आहे असे सांगत ही सभा तहकूब केल्याचा सांगण्यात आले.
मात्र याचे स्पष्टीकरण सत्ताधाऱ्यांकडून दिले नाही. नगरसेवक अण्णा लेवे, विरोधी पक्षनेते अशोक मोने, भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी यावर परखड मत व्यक्त करत सत्ताधारी पक्षात एकी नसल्याने आपले अपयश लपविण्यासाठी ही सभा तहकूब केल्याचा आरोप करण्यात आला आहे.