यंदा सार्वजनिक दुर्गा मंडळांच्या मूर्ती ची ऑर्डर नाहीत
प्रतिनिधी / सातारा
गणेशोत्सवानंतर नवरात्र उत्सवाला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. कुंभारवाडय़ात दरवर्षी दुर्गा देवीच्या मूर्ती तयार होऊन रंगकाम सुरू असते. यंदा सार्वजनिक दुर्गा मंडळांनी मूर्ती तयार करण्याचा ऑर्डर दिल्या नाहीत. यामुळे दीड फुट उंचीच्या मूर्ती बनवण्यात आल्याचे मूर्तीकार पोपट कुंभार यांनी ‘तरूण भारत’ शी बोलताना सांगितले.
यंदाचा गणेशोत्सव कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आला. या गणेशोत्सवानंतर नवरात्र उत्सवाची चाहूल लागली आहे. येत्या 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सव साजरी होणार आहे. दरवर्षी उत्सव साजरी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू असते. या उत्सवात दुर्गा देवीच्या मूर्तीचे विशेष आकर्षण असते. दरवर्षी 10 ते 11 फुट उंचीच्या मूर्ती तयार करण्यात येतात. शहरातील सार्वजनिक दुर्गा मंडळे भव्य अशी दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. परंतु या उत्सवालाही कोरोनाचे ग्रहण लागले आहे. नवरात्र उत्सव एक महिन्यावर आला असून 40 ते 50 मंडळे मूर्ती बनवण्याची ऑर्डर देतात. मात्र उत्सव रद्द होण्याच्या भीतीने दुर्गा मंडळांनी कुंभारवाडय़ात मूर्ती बनवण्याच्या ऑर्डर दिलेल्या नाहीत. यामुळे कुंभारवाडय़ात मूर्तीकारांनी दीड फुटांच्या मूर्ती बनवल्या आहेत. मागणी कमी असल्याने फक्त 25 ते 30 मूर्ती तयार आहेत. या मूर्ती 2 हजार ते अडीज हजार रूपये किंमतीच्या आहेत. शाडुच्या मूर्ती बनवण्यावर भर दिल्याचे मूर्तीकार कुंभार यांनी सांगितले.