प्रतिनिधी / नागठाणे :
पोलीस असल्याचे सांगून दोघांनी वृद्धाची फसवणूक करत सोन्याची चेन लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी नागठाणे (ता.सातारा) येथे घडली. दोन अज्ञातांनी यावेळी सुमारे ५३ हजार रुपये किमतीची चेन पळवली. याची फिर्याद कृष्णा जगू नावडकर (वय.६९,रा-सोनापूर, ता.सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी कृष्णा नावडकर हे पत्नीसह कामानिमित्त नागठाणे येथे त्यांच्या दुचाकीवरून आले होते. सकाळी १०.३० च्या सुमारास ते येथील पेट्रोल पंपावरून दुचाकीत पेट्रोल भरून सेवारस्त्याने नागठाणेकडे यायला निघाले. सेवारस्त्यानजीकच्या नाकोडा स्टील ट्रेडर्सजवळ ते आले असता त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी त्यांची गाडी थांबवली. या युवकांनी तोंडाला मास्क लावला होता. यावेळी त्या दोन्ही अज्ञातांनी त्यांना ‘आपण पोलीस आहोत’ असे सांगून या रस्त्यावर चोऱ्या खूप होता आहेत तरी तुमच्या सोन्याच्या वस्तू खिशात ठेवा असे सांगितले.यावेळी कृष्णा नावडकर यांनी बोटातील अंगठी व घड्याळ काढून खिश्यात ठेवले. नंतर गळ्यातील ११ ग्राम वजनाची सोन्याची चेन ठेवत असताना त्यांनी ती त्यांच्याकडील कागदावर ठेवण्यास सांगितले. चेन ठेवल्यानंतर कागदाची पुडी करून ती परत त्यांना देत नीट ठेवण्यास सांगितले. ही पुडी त्यांनी दुचाकीच्या डिकीत ठेवली व ते नागठाणेकडे आले.
नागठाणे गावात आल्यानंतर त्यांनी खिशात ठेवलेली अंगठी व घड्याळ घातले व चेन घालण्यासाठी पुडी सोडल्यावर त्यात सोन्याची चेन नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आढळून आले नाही. चोरट्यानी त्यांची ५३ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन पोलीस असल्याचा बनाव करत हातोहात लांबवली. शनिवारी रात्री उशिरा याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास सपोनि डॉ. सागर वाघ करत आहेत.