●शिक्षक संतोष लोहार यांनी लॉक डाऊनमध्ये मित्राच्या सहकार्याने लढवली शक्कल
●माझं घर माझी शाळा उपक्रमातून मुलांची जडणघडण
●दोन दिवसाआड शाळेत जाऊन प्रत्यक्ष देतात शिक्षण
●अभ्यासमित्र देतात व्हिडीओद्वारे शिक्षण
सातारा / प्रतिनिधी
शाळा कुठलीही शिक्षक उपक्रमशील असला की शाळेचा कायापालट होतो. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या शिक्षकांची धडपड त्यांच्या कृतीतून पहायला मिळते. अशीच जावली तालुक्यातील निपाणी मुरा ही शाळा. जेथे मोबाईलचे नेटवर्क नाहीच म्हणलं तर चालेल.पावसाळ्यात सतत धुके आणि जोराचा पाऊस, उन्हाळ्यात पाण्याची टंचाई. लॉकडाऊन झालं मार्च महिन्यात. तेव्हापासूनच आपल्या शाळेतला विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रवाहात राहिला पाहिजे ही तळमळ शिक्षक संतोष लोहार यांची. माझ घर माझी शाळा ही संकल्पना त्यांनी सत्यात उतरवली. मित्राच्या सहकार्याने त्यांनी संगणक पालकांच्या घरात बसवले अन अभ्यासमित्राच्या सहकार्याने शाळा सुरू केले. ऑफ लाईन संगणकावर मुले बाहेरच्या जगातले अध्यवत ज्ञान घेऊ लागले. हा उपक्रम होत असताना कसलीच कुठे प्रसिद्धी नाही. गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.
जावली तालुक्यातील निपाणी मुरा ही शाळा डोंगर कपारीतली शाळा आहे.डोंगरावरच्या शाळेवर शिकवायला शिक्षक सहसा तयार होत नसतात.परंतु जो हाडाचा शिक्षक आहे तो डोंगरावरच्या शाळेवर काम करून तेथील विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम करतो.असेच संतोष लोहार हे शिक्षक उपक्रमशील शिक्षक म्हणून कुठे ही प्रसिद्धीच्या झोतात नसतात आपले काम भले आणि आपण भले, ज्ञानदानाचे पवित्र कार्य ते करत असतात.निपाणी मुरा या शाळेचा पट 21 आहे.पहिली ते पाचवी पर्यत वर्ग आहेत.या शाळेत लॉक डाऊनमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एक प्रयत्न म्हणून त्यांनी एक छोटा प्रयोग राबवण्याचा प्रयत्न केला.गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी उपक्रम सुरू केला.त्यांच्या मित्राकडून संगणक आणले अन विद्यार्थ्यांच्या घरातच बसवले.चार घरात चार संगणक बसवले.एक तर त्या गावात मोबाइल जेमतेम लोकांच्याकडे ते ही रेंजचा भरोसा नाहीच.अशा ठिकाणी टॅब मुलांना देऊन उपयोग होणार नाही.टॅबऐवजी संगणक जोडून गावात अभ्यास मित्र गावात तयार केले.त्यांच्याकडून जे गणित,विज्ञान, भाषा, इतिहास या विषयाचे व्हिडीओ त्या संगणकात पेन ड्रायव्हवर भरून शिक्षण दिले जाऊ लागले.तसेच अथर्व मगर याचे ऑर्गनिग कलेचे व्हिडीओ तसेच ज्ञानरचना वाद कुमठे बिटात तयार केलेले व्हिडीओ ही विद्यार्थ्यांना उपयोगी पडत आहेत.या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत शिक्षण : संतोष लोहार, शिक्षक
मुलांना संगणकाचे ज्ञान असणे जरुरी आहे.संगणकाद्वारे शिक्षण दिल्याने त्यांना हल्लीच्या व्यवहारातील टॅली,एमएस ऑफिस हाताळणे काहीच अवघड बनणार नाही.इतर विषयाच्या गोष्ठीरुप व्हिडीओ संगणकावर शिकवल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल गोडी निर्माण होत आहे.डोंगर भागातला विद्यार्थी कुठे ही मागे नाही हेच त्यांच्या शिकण्याच्या गोडीमुळे मला वाटते.पालकांचं सहकार्य आणि गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण सर यांचं मार्गदर्शन नेहमी लाभल्याने हा उपक्रम लॉक डाऊनमध्ये यशस्वी करू शकलो याचा मला आनंद होत आहे.