कुडाळ / प्रतिनिधी :
हुमगाव तालुका जावळी येथे पती- पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कॉन्स्टेबल पद्मसेन संभाजीराव घोरपडे (वय 28) यांना महिलेच्या पतीने मारहाण करत जखमी केले.
याप्रकरणी महिलेचा पती संतोष व्यंकट पवार (राहणार हुमगाव) त्यावर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजता हेडक्वार्टर सातारा येथे हूमगाव तालुका जावळी येथील महिला अश्विनी संतोष पवार हिने पती संतोष पवार हा मारहाण करत आहे. यासंदर्भात मला मदत करावी, असा फोन केला. त्यानंतर सातारा पोलीस हेडक्वार्टरच्या माध्यमातून कुडाळ पोलीस स्थानकामध्ये सदर महिलेचा मारहाण करत असल्याचा फोन आला आहे व त्याची खात्री करून पुढील कारवाई करावी असे आदेश आल्यानंतर कुडाळ पोलीस स्थानकामध्ये ऑनड्युटी असणारे पद्मसिंह संभाजीराव घोरपडे कॉन्स्टेबल यांनी हूमगाव तालुका जावळी येथे सदर घटनेची माहिती घेतली.
घटनास्थळी पती-पत्नी भांडण करत असतानाच कॉन्स्टेबल घोरपडे भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी महिलेचा पती संतोष पवार याने हेडकॉन्स्टेबल घोरपडे यांना मारहाण करत जखमी केले. आरोपी पवार याला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक कदम अधिक तपास करत आहेत.