प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत मैल्यापासून व ओल्याकचऱ्यापासून बंगलोरी पद्धतीचे खत तयार करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने नुकतीच सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कचरा वेचकांना खत तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कचरा वेचक खत तयार करुन विक्री होणाऱ्या खताच्या उत्पन्नातून त्यांना मानधन मिळणार आहेत.
मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यामुळे या प्रकल्पास चालना मिळत आहे. शहराच्या पर्यावरण रक्षणसाठी त्यांच्याच संकल्पनेतून शासन पातळीवरुन शहरातील दररोज तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर आणि मैल्यावर खत निर्मिती करता येईल, असे समोर आले. त्यानुसार सेंटर फॉर वॉटर ऍण्ड सॅनिटायझ फौंडेशन, सीईपीटी या संस्थेकडून नुकतेच कचरा वेचकांना मार्गदर्शन करण्यात आले.
सोनगाव कचरा डेपोत नव्याने उभारण्यात आलेला मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र कचरावेचक संघाला देण्यात आले आहे. तेथे सेल्टर मशिन बसवून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. हे खत बंगलोरी पद्धतीचे असून या खताला विक्री करण्यासाठी त्याच संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. विशेष म्हणजे यामुळे पर्यावरणाची हानी रोखता येणार आहे.