मास्क न वापरणाऱयांवर सोमवारपासून होणार दंडात्मक कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
देशात नव्याने दाखल झालेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढु नये म्हणून नवे निर्देश लागू करण्यात आले आहेत. या निर्देशानुसार सातारा नगरपालिकेचे टास्क फोर्स पुन्हा सक्रीय झाले आहे. मास्क वापरणे सक्तीचे केले असून मास्क न वापरणाऱयांवर सोमवार दि. 6 पासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिम वेगाने राबविण्यात येत आहे. जिह्यात 91.5 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. नागरिक ही काळजी घेत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यातच नव्याने आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. यामुळे देशात पुन्हा चिंतेची लाट पहायला मिळत आहे. व्हेरियंटचा परिणाम अद्याप समोर आलेला नाही. परंतु कोरोनासारखा यांचा फैलाव होवू नये म्हणून कडक निर्देश लागू करण्यात आले आहेत. या निर्देशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सातारा नगरपालिकेचे टास्क फोर्सने येत्या सोमवार दि. 6 पासून मास्क न वापरणाऱयावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येकी 500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच विक्रेत्यांवर ही मास्क न वापरल्याचे आढळल्यास कारवाई होणार असल्याचे सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडून सांगण्यात येत आहे.