कचरागाडीचा नवीन ठेका अडकला गुंत्यात
प्रतिनिधी/ सातारा
सुमारे दीड वर्षापूर्वी सातारा पालिकेच्या सेवेत आलेल्या कचरा गाडयांची अवस्था बिकट अशी बनलेली आहे. कचरागाडय़ांच्या मेन्टंन्सकडे दुर्लक्ष केले जात असून तब्बल चार गाडय़ांचे टायर्स खराब झाले असून 10 गाडय़ांवर तर हेल्परच नाही. तरीही हेल्परचा पगार काढला जात आहे. तशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असून एका गाडीची तर बिकट अवस्था असून गाडीचे चाकच गायब झाले असून आठ दिवसापासून गाडी उभी असल्याचे सांगण्यात येते. नव्याने काढण्यात येणारा कचरागाडीचा ठेकाही गुंत्यात अडकल्याची चर्चा रंगत आहे.
सातारा शहरातील घरोघरी जावून कचरा गोळा करण्यासाठी ठेकेदाराच्या पूर्वी गाडय़ा होत्या. परंतु सातारा पालिकेने स्वतःच्या गाडय़ा गेल्या दोन वर्षापूर्वी खरेदी करुन पंधरा महिन्यापूर्वी त्या सेवेत दाखल झाल्या. कचरा उचण्यासाठी या गाडय़ा सातारा शहरातून धावतात अन् काम झाल्यानंतर हुतात्मा स्मारक परिसरात लावल्या जातात. ठेकेदाराकडून कोणत्याही वॉर्डात कचरा राहू नये, स्वच्छता राहवी हे नियोजन असते. त्यासाठी सातारा पालिका कोटय़ावधी रुपयांचा निधी खर्च करते. परंतु पालिकेच्या कचरा गाडयांची अवस्था सध्या बिकट अशी झालेली आहे. गाडय़ांची टायर झिजलेली आहेत. काही गाडय़ांची इंजिन ऑईल लेव्हल कमी झालेली आहे. तर गाडय़ावर चालक अप्रशिक्षीत असा असून तब्बल दहा गाडय़ांवर तर हेल्परच नाही. त्यामध्ये 7,10, 12, 15, 18, 21, 24, 29, 26 या गाडय़ांचा समावेश असून 6 महिन्यापासून हेल्पर नसून हेल्परचा पगार काढला जात असून यामध्ये सातारा पालिकेला 4 लाख 20 हजार रुपयांचा तोटा होत आहे. गाडय़ांची दुरावस्था करण्यात आली असून याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून याची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी केली आहे.