कार्यक्रमाला घेतले जातेय अव्वाच्या सव्वा फी
प्रतिनिधी/ सातारा
कुपर कॉलनीतील नागरिकांना छोटेमोठे कार्यक्रम करता यावेत याकरता पालिकेच्यावतीने मनोमीलनाच्या काळात लाखो रुपये खर्च करुन हॉल बांधण्यात आला. विशेष म्हणजे त्या कॉलनीतील नागरिकांनी या हॉलच्या वापरासंबंधी कुपर कॉलनी सांस्कृतिक मंडळ काढले आहे. मात्र, भरमसाठ भाडे घेतले जात असून हे भाडे नेमके कोणाकडे जाते?, त्यातून नेमके काय केले जाते?, पालिकेने बांधलेल्या बहुउद्देशीय हॉलची दुरावस्था झाली असून साताऱयातील सर्वसामान्य भुर्दंड सोसत आपले कार्यक्रम साजरे करत असतात.
सातारा पालिकेने शहरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक हॉल, बहुउद्देशीय हॉल, सभागृहे बांधली आहेत. त्या परिसरातील नागरिकांना त्याचा उपयोग होत असतो. परंतु सातारा शहरात कुपर कॉलनीत मनोमीलन काळातील तात्कालिन नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले यांच्या काळात बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजेंच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी तात्कालिन नगरसेवक संजय साठे, निशांत पाटील, नगरसेविका स्नेहा नलावडे, तात्कालिन बांधकाम सभापती मनिषा भणगे, तात्कालिन महिला बालकल्याण सभापती अनुसया गायकवाड आणि तात्कालिन मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्यावेळी केवळ नाममात्र शुल्कामध्ये हे सभागृह लग्न, बारसे व इतर कार्यक्रमाला वापरण्यासाठी दिले जात होते. पालिकेने बांधलेल्या हा बहुउद्देशीय हॉल वास्तविक पहाता तेथील नागरिक कधीही त्यांच्या कार्यक्रमासाठी वापरत नाहीत. बाहेरच्या नागरिकांना आपले कार्यक्रम, उत्सव करण्यासाठी स्वस्तात हॉल म्हणून याचा वापर करतात. परंतु पालिकेचा या हॉलला सध्या सुमारे दहा हजार रुपये एका दिवसाचे भाडे घेतले जात असून शहरात पालिकेचे शाहु कला मंदिर आहे त्या मंदिरालाही सुमारे दहा हजाराच्या आसपास भाडे आहे. त्यामुळे एवढय़ा मोठया प्रमाणात आकारले जाणारे भाडे नेमके कोणाच्या खिशात जाते अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
हॉलमध्ये गैरसोयी
ज्या प्रमाणात भाडे घेतले जाते त्या प्रमाणात सोयी सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. परंतु या हॉलमध्ये जर लग्न सोहळा असेल तर त्याकरता वधूवरांना चेंजींग रुम प्रशस्त असा नाही. फॅन व साऊंड सिस्टिम योग्य प्रकारे चालत नाही. सगळय़ा गैरसोयीच दिसत आहेत.
पूर्वी पाचशे रुपये घेतले जात होते
आताचे मला माहिती नाही किती घेतात ते परंतु पूर्वी पाचशे रुपये घेतले जात होते. नाममात्र शुल्कात तो हॉल लगेच दिला जात होता. आता जर रक्कम वाढवली असेल तर माहिती घ्यावी लागेल.
निमिष शहा सातारकर