प्रारुप मतदार यादीत मोठा घोळ, हजारो नावे एका वॉर्डातून दुसऱया वॉर्डात
प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेत येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी तपासणीचे काम सुरु आहे. त्यावर हरकती घेण्याची मुदत दि. 1 जुलैपर्यंत होती. त्यामध्ये अनेक त्रुटी इच्छुकांच्या निदर्शनास येत आहेत. चक्क हजारो नावे एका वॉर्डातून दुसऱया वॉर्डात आलेली आहेत. तर काहीजण गावाकडे राहतात पण शहराच्या मतदार यादीत नाव आले आहे. चांगल्या पॉश भागात बंगला असून त्याचे नाव झोपडपट्टीत आले आहे. काही तर नावे बोगस आल्याच्या तक्रारी सातारा पालिकेत आल्या असून नुसता तक्रारींचा पाऊस पडलेला आहे.
सातारा पालिकेत गेल्या चार दिवसांपासून मतदार यादी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या याद्या पाहण्यासाठी इच्छूक व माजी नगरसेवकांनी गर्दी केलेली आहे. दरम्यान, आलेल्या हरकतीनुसार तब्बल एका प्रभागातून हजार नावे अन्य प्रभागात दाखवण्यात आलेली आहेत. तर एका बंगलेवाल्याचे नाव चक्क झोपडपट्टीत दाखवण्यात आले आहे. तर काही नागरिक हे शहरात राहतच नाहीत गावात राहतात. त्यांचे नाव पालिकेच्या मतदार यादीत आलेली आहेत. तर काही नावे ही पालिकेच्या यादीत घुसडली गेली आहेत अशाही तक्रारी झालेल्या आहेत. तर काहीजणांनी आपल्या प्रभागातील नावे इतर प्रभागात कशी गेली अशाही तक्रारी आहेत.
प्रशासनाची चूक
राजवाडा परिसरातील नावे बोगदा परिसरात नाव आले आहे. तर बोगद्यातील नाव व्यंकटपुऱयात आले आहे. मतदाराला निवडणुकीसाठी त्रास होणार आहे. प्रशासनाचा गलथानपणा आहे. नुसती संख्या वाढवण्यासाठी मतदार याद्या फायनल केल्या आहेत. ज्या त्या भागात नावे यावेत यासाठी तक्रार केली आहे. चारशे ते पाचशे नाव ही बोगस आहेत. प्रशासनाने दुरुस्ती करावी.
राजन चतुर
स्वतःशोधून हाताने नावे लिहून तक्रार केली
प्रभाग क्र. 23 मध्ये अनेक मतदार प्रभाग 24 मध्ये होणे अपेक्षित असताना प्रभाग 23 मध्ये दाखवण्यात आले असून त्याचा शोध घेऊन हाताने नावे लिहून रवींद्र पाटेकर या तक्रारदाराने पालिकेकडे तक्रार केली आहे. अशा अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. काहींनी तर आपल्या प्रभागातील मतदार वाढवण्यासाठी खटपट सुरु केली आहे.