प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेत प्रथमच नगराध्यक्षा सौ. माधवी कदम आणि मुख्याधिकारी म्हणून रंजना गगे यांच्यासह पालिकेतील विविध विभागात 11 महिला अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर पालिकेची मदार असून अगदी सभा कामकाजापासून ते वसुलीचे कामकाज पाहण्यापर्यंत महिलांचा पालिकेत वरचष्मा होता. कोरोना कक्षातही महिला अधिकारी सक्षमपणे जबाबदारी पाळत होत्या. परंतु आता मुख्याधिकारी म्हणून रंजना गगे या आल्याने पालिकेत महिला राज सुरु झाला आहे.
सातारा पालिकेच्या इतिहासात प्रथमच महिलांची संख्या मोठी दिसत आहे. चतुर्थश्रेणी काम करणाऱया महिला कर्मचारी सुरुवातीपासून पालिकेत आहेत.परंतु अधिकाऱयांच्या पातळीवरही महिलांची संख्या आता वाढली आहे. वसुली विभागाचे कामकाज पाहणाऱया श्रीमती जाधव, आस्थापना विभागात महिला श्रीमती कुलकर्णी, बांधकाम विभागात साबळे, देसाई या दोन महिला अभियंता, शहर विकास विभागात एक महिला, सहाय्यक लेखापाल म्हणून महिला आहेत. अशा 11 महिला अधिकारी पालिकेत असून आता बहुतांशी महिलांच्याच हातात पालिकेचा कारभार आहे. अधिकाऱयांमध्ये जसे महिलांचे प्राबल्य आहे. तसेच पदाधिकाऱयांमध्ये सातारा विकास आघाडीच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, आरोग्य सभापती सौ. अनिता घोरपडे या दोघी महिला पदाधिकारी आहेत. तसेच आघाडीच्या नेत्या म्हणून स्मिता घोडके या आहेत. एक प्रकारे सातारा पालिकेत आता नव्याने महिलांच्या हातीच कारभारची सुत्रे आपोआपच गेल्याचे दिसत आहे.