शाहूपुरी : सातारा आगारातून पुणे-सातारा मार्गावर धावणाऱ्या विना वाहक-विना थांबा सेवेसाठी लवकरच महामंडळामार्फत १५ सुसज्ज नवीन बसेस देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष मुख्य व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा व सांगली विभागाची आढावा बैठक साताऱ्यात पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस महाव्यवस्थापक शैलेश चव्हाण, संजय सुपेकर, यंत्र विभागाचे महाव्यवस्थापक कांबळे, उपमहाव्यवस्थापक अमित गायकवाड, मुख्य सांख्यिकी अधिकारी, सातारा व सांगली विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सातारा व सांगलीच्या विभाग नियंत्रकांकडून विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेतला. सातारा व सांगली विभागातील सर्व आगारांनी आपल्या कामकाजामध्ये सुधारणा करावी, तसेच उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना शेखर चन्ने यांनी दिल्या. सातारा-पुणे मार्गावर धावणाऱ्या नॉनस्टॉप बसेसना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या मार्गावर महामंडळामार्फत सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशा नव्या १५ बसेस लवकरच सातारा आगाराला देण्यात येणार असल्याचे चन्ने यांनी सांगितले.