सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील राधिका रस्त्यावरील जिल्हा परिषद संचलित प्रतापसिंह सेंद्रीय शेती फार्ममध्ये अज्ञात चोरट्यांनी दि. 24 रोजी रात्रीच्या सुमारास प्रवेश करुन तेथे उसाला आग लावली. तसेच रोप वाटिकेतील रोपे अस्ताव्यस्त करत 23 हजार रुपयांचे नुकसान केले आहे. यावेळी चोरट्यांनी 2 हजार रुपये किंमतीच्या पाच लोखंडी पाईपाही चोरुन नेल्या आहेत.
याबाबत शिपाई अजित जनार्दन शेवते (वय 42 रा. केसरकर कॉलनी, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 24 रोजी रात्रीच्या वेळी अज्ञातांनी प्रतापसिंह शेती फार्ममध्ये घुसून हा प्रकार केला आहे. यामध्ये 20 हजार रुपये किंमतीचा ऊस पेटवून दिला असून 700 रुपयांच्या रोपांचे तसेच टेबलवरील काच फोडून 300 रुपयांचे नुकसान केले आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मोहरे करत आहेत.